

श्रीनगर (जम्मू-काश्मीर ); पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील हंगलकुंड कोकरनाग भागात गुरुवारी (दि.१६) रोजी रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. तर गेल्या २४ तासांत सुरक्षा दलाच्या जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी या घटनेला दुजोरा देत चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची नावे जाहीर केली आहेत. यात त्यांनी हिज्बुल मुजाहिदीन कमांडर जुनैद भट आणि दहशतवादी बासिल भट अशी नावे सांगितली. गेल्या वर्षी (२०२१मध्ये) अनंतनागमध्ये भाजपचे सरपंच रसूल दार, त्यांची पत्नी आणि पंच यांच्या हत्येत बासिल भट यांचा हात असल्याची माहिती दिली. तसेच तो २०१८ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. हत्येच्या घटनेनंतर पोलिस त्याच्या शोधात होते. तर गुरूवारी झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
याआधी गुरुवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी कुलगामच्या मिशीपोरा भागात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. याबबतची माहिती देताना आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, टार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक जुबैर सोफी होता. त्याचा गोपालपुरा कुलगाम येथील हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येत सहभाग होता.
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात वेगवेगळ्या चकमकीत १८ हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. तर गेल्या २४ तासात सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. वर्षात १११ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?