

भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : नवीन भोकरदन परिसरात सोमवारी दुपारी शाळेतून वस्तीगृहाकडे निघालेल्या पाच ते सहा मुलींच्या मागे तीन मोटर सायकलस्वार लागले. मुली घाबरलेल्या अवस्थेत पुढे पळताना दोन मुली खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. घडलेल्या प्रकारामुळे वस्तीगृहातील मुलींसह इतर मुलीच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील प्रियदर्शनी मुलींचे हायस्कूल व शिवाजी विद्यालयातील आठ मुली एकत्रितपणे वस्तीगृहाकडे निघाल्या होत्या. यावेळी रामेश्वर महाविद्यालयाजवळील परिसरात एका मोटरसायकलवर तीन मुले बसून आली आणि त्यांनी मुलींचा पाठलाग केला. याच दरम्यान या रोडरोमिओंनी मुलांची छेड काढत अश्लील भाषेत बोलू लागले. सर्व मुलींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या मुलांनी आमचा पाठलाग सुरूच ठेवल्याचे या वस्तीगृहातील मुलींनी सांगितले.
दरम्यान मोटर सायकलवरील रोडरोमिओ पाठलाग करत असताना सर्व मुली घाबरून पळाल्या होत्या. यावेळी नेहा, अंकिता व जयश्री यांच्यासह इतर मुली जोरजोरात पळू लागल्याने दोघीजणी जोरात खाली पडल्या आणि जखमी झाल्या आहेत. यातील नेहाच्या दोन्ही गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
यानंतर या मुली घाबरलेल्या अवस्थेत तेथीलच पत्रकार सोसायटीतील घराजवळ येवून रडायला लागल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंडे यांनी तातडीने पोलीस अशोक निकम यांना घटनास्थळी पाठवले. गेल्या काही महिन्यापासून निर्भया पथकाची कारवाई थंडावली असल्याने मुलींची छेड काढण्याचे प्रकार पुन्हा वाढले असल्याचे दिसत आहे. या मुलींचा दुचाकीवर पाठलाग करणाऱ्या त्या तीन तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घडलेल्या घटनेमुळे मात्र, वस्तीगृहातील मुलींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तर जखमी नेहाला तिच्या वडिलांनी दवाखान्यात उपचार करून घरी घेऊन नेले आहे.
यापूर्वी मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ झाली होती. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे होत त्यांनी निर्भया या विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे पालकांना दिलासा मिळाला होता. परंतु, आता या पथकाची मोहिम थंडावली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मुलींच्या छेडछाडीचा प्रकार कळतात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, हे असे प्रकार यापुढे घडू नये अशी विनंती पालकांकडून करण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी अशोक निकम यांनी मुलींची भेट घेऊन चौकशी करत त्यांना धीर दिला. मात्र, यापुढे शाळेत कसे जावे? या भीतीने त्या ग्रस्त आहेत.
हेही वाचलंत का?