

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोग मार्च/ एप्रिल 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या नियमानुसार पोलिस अधिकार्यांच्या बदल्या, पदस्थापना करण्यात येणार आहे. महासंचालक विभागाने निवडणुकीशी संबंधित पोलिस अधिकार्यांची माहिती मागवली आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील काही पोलिस अधिकार्यांची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे. सतराव्या लोकसभेचा कालावधी 16 जून 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोग मार्च / एप्रिल 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 याचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्व घटक प्रमुखांना सोमवारी (दि. 4) पोलिस अधिकार्यांच्या बदल्या संदर्भात गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना / निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, घटकप्रमुखांनी पोलिस अधिकार्यांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात सुरुवात केली आहे.
महिन्याभरातच बदल्यांची शक्यता
भारत निवडणूक आयोग मार्च / एप्रिल 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 याचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. असे असले तरीही निवडणुकीसंदर्भातील बदल्या पुढच्या महिन्यातील 14 तारखेपासूनच कराव्यात असे, गृह विभागाच्या आदेशात नमूद आहे. त्यामुळे बदल्यांची टांगती तलवार असलेल्या अधिकार्यांकडे पोस्टिंगची फिल्डिंग लावण्यासाठी अतिशय कमी कालावधी उरल्याचे बोलले जात आहे.
गृह विभागाच्या पत्रानुसार आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रभारी पोलिस अधिकार्यांची माहिती मागवण्यात आली आहे. माहिती संकलित झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकार्यांची यादी गृह विभागाकडे पाठवण्यात येईल. आयोगाच्या निकषानुसार पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातही काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी- चिंचवड
हेही वाचा :