पुणे : महापालिकेत समाविष्ट गावांच्या समितीचा तिढा वाढणार 

पुणे : महापालिकेत समाविष्ट गावांच्या समितीचा तिढा वाढणार 
Published on
Updated on
पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत समाविष्ट 34 गावांसाठी नेमण्यात येणार्‍या समितीचा तिढा आणखी वाढणार आहे. सत्ताधारी महायुतीमधील पक्षांनी सदस्यांच्या स्वतंत्र याद्या दिल्याचे समोर आल्यानंतर आता विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस  यांनी सदस्यांच्या याद्या देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ही समितीच बेकायदेशीर असून, त्यास विरोध करणार असल्याचा पवित्रा शिवसेनेने (ठाकरे गट) घेतला आहे.  त्यामुळे विभागीय आयुक्तांपुढे नवा पेच निर्माण होऊन समितीच्या स्थापनेचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने अधिवेशनात दिले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने समिती गठित करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी समितीत नेमण्यात येणार्‍या सदस्यांच्या नावाच्या स्वतंत्र याद्या विभागीय आयुक्तांना दिल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी त्यावर निर्णय न घेता यासंबंधीच्या निर्णयाचा चेंडू नगरविकास खात्याकडे टोलविला आहे.
यासंबंधीचे वृत्त दै. 'पुढारी'ने प्रसिध्द केल्यानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस  यांनीही समाविष्ट गावांसाठीच्या समितीत सदस्यांनी स्वतंत्रपणे नावे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही सदस्यसंख्या सातत्याने वाढत असल्याने नवा पेच निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, एका गावामधून एकापेक्षा अधिक नावे आल्याने नक्की कोणाचे नाव घ्यायचे आणि कोणाचे काढायचे? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी शिफारस  केलेली यादी घ्यावी

समाविष्ट गावांसाठी जी समिती नेमण्यात येणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सदस्यांना संधी मिळावी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिफारस केलेल्या नावांचीच या यादीत समावेश करावा, अशी मागणी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी स्वतंत्र नावे यापूर्वी दिलेली आहेत. त्यामुळे अजित पवार गटात समितीच्या सदस्यांच्या नावावरून थेट फूट पडल्याचे चित्र आहे.
समाविष्ट गावांचा विकास करायचा असेल, तर त्यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यानुसार काँग्रेसकडून समाविष्ट गावांतील सदस्यांच्या नावांची यादी विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. जर आमच्या सदस्यांना संधी मिळाली नाही, तर आम्ही त्याविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.
अरविंद शिंदे, 
शहराध्यक्ष काँग्रेस
विभागीय आयुक्तांनी समिती स्थापन करताना सर्वांना संधी द्यावी, अशी आमची मागणी आहे. राष्ट्रवादीकडून आम्ही त्यासाठी सदस्यांची नावे देणार आहोत. आमच्या सदस्यांना समितीत स्थान मिळेल आणि ही समिती समतोल साधणारी असेल, अशी अपेक्षा आहे.
  – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 

समिती बेकायदेशीर असेल

गावांसाठी अशा पध्दतीने समिती स्थापन करून सत्ताधारी पक्षाला वाटेल त्यांची त्यावर निवड करण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. भविष्यात महापालिकेच्या निवडणुका न घेताच मुख्यमंत्री त्यांच्या मर्जीने सदस्य निवडतील. त्यामुळे पालिका आयुक्तांपासून नगर अभियंत्यांपर्यंत इतर सदस्यांची गरजही लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा हा उद्योग आहे. त्यामुळे या बेकायदेशीर समितीला आमचा विरोध असून, त्याविरोधात आम्ही आवाज उठविणार आहोत.
– गजानन थरकुडे, शहरप्रमुख 
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news