

टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 'सुपर-12'चा थरार आजपासून सुरु होत आहे. या स्पर्धेतील सर्वात हाय होल्टेज भारत -पाकिस्तान ( Ind vs Pak ) सामना उद्या ( दि.२४) रंगणार आहे. या सामन्याकडे देशवासियांचे लक्ष वेधले आहे. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने या सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.
विश्वचषक स्पर्धेमध्ये ( Ind vs Pak ) पाकिस्तानविरोधातील प्रत्येक सामन्यामध्ये भारत अजिंक्य राहिला आहे. या स्पर्धेच्या इतिहासाचा विचार करता एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकुण सात सामने झाले आहेत. तर टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाच सामने खेळले गेले आहेत. या सर्वच सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. उद्याच्या सामन्यातही भारत हा विक्रम अबाधित ठेवणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
भारत -पाकिस्तान सामन्यावेळी सर्वांच्या नजरा या कर्णधार विराट कोहलीच्या खेळाकडे असतील. विराटच्या फलंदाजीकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असणार आहे. पाकिस्तानमध्येही विराटप्रेमी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने या सामन्यामध्ये विराटपेक्षाही भारताचा आणखी एका खेळाडू चांगली कामगिरी करेल, असे म्हटलं आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा आपल्या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान क्रिकेटबाबत आपले मत मांडत असताे. उद्याच्या सामन्याबाबत त्याने म्हटलं आहे की, विराट कोहली पाकिस्तानविरोधातील सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करेलच. मात्र भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा हा विराट कोहलीपेक्षाही महान खेळाडू आहे. तो भारताचा इंजमाम उल हक असून, या सामन्यात विराटपेक्षाही रोहित शर्माची कामगिरी लक्षवेधी ठरेल.
पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी हे नेहमीच भारतीय खेळाडूचं कौतुक करत असतात. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात ऋषभ पंत याने केलेल्या फलंदाजीचे पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींनी प्रशंसा केली होती. तसेच सूर्यकुमार यादव याच्या फलंदाजीचेही पाकिस्तानमध्ये फॅन आहेत, असेही अख्तर याने म्हटलं आहे.
पैसे कमविण्यासाठी मी माझे मत व्यक्त करतो, अशी टीका काही जण माझ्यावर करतात. मात्र ही टीका निराधार आहे. एक माजी क्रिकेटपटू, क्रिकेटचा प्रचारक आणि एक व्यक्ती म्हणून माझे विधान नेहमी समतोल असावे, असा माझा प्रयत्न असतो. भारतातही माझे चाहते आहेत, यावरुन मी स्वत:ला भाग्यवान मानतो. भारतामधून मला नेहमीच सर्वाधिक प्रेम मिळालेआहे. मी स्वत:च्या आणि भारतीयांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतो, असेही शोएब अख्तर याने म्हटले आहे.