

नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवारी लागलेल्या आगीत (#AhmednagarFire) १० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. ते सर्व कोरोनाबाधित होते. शॉर्टसर्किटमुळे आयसीयूत आग लागली. यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला. रामकिसन हरगुडे, सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्वनाथ जडगुळे तसेच एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला. मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. गर्दीला पांगवताना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. जिल्हा शल्यचिकित्सकांना निलंबित करण्याची मागणी प्रहार संघटनेने केली. काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, रिपाइं अशा सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. मृतदेहांची उत्तरीय तपासणी सुरू आहे.
दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना जिल्हा रुग्णालयाला भेटून देऊन आयसीयू विभागाला लागलेल्या आगीची पाहणी केली.
दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. "नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो." असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.