नगर जिल्हा रुग्णालयास आग: पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले… | पुढारी

नगर जिल्हा रुग्णालयास आग: पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क

नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवार (दि.०६) सकाळी आग लागली. या दुर्घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या दुर्घटनेबाबत वक्तव्य केले आहे.

हसन मुश्रीफ म्‍हणाले की, नगर जिल्हा रुग्लालय मोठे आहे. या घटनेबाबत मला अद्‍याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. आज भाऊबीजेचा सण असल्याने आम्ही सगळे या कार्यक्रमात होतो. यावेळी मला स्थानिक आमदारांनी फोनवरून या दुर्घटनेची माहिती दिली.  ही आग कोणत्या कारणाने लागली, याचा नेमका तपास करावा लागेल. जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्याकडून आम्ही माहिती घेत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीत दोषींवर कारवाई होणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

शाॅटसर्किटमुळे आयसीयूत आग

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. ते सर्व कोरोनाबाधित होते. शॉर्टसर्किटमुळे आयसीयूत आग लागली. यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने तसेच एमआयडीसी आणि लष्कराच्या दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग लागल्यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. अत्यवस्थ रुग्णांना इतर कक्षात स्थलांतरित करण्यात आले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि बचावकार्यास वेग दिला. रामकिसन हरगुडे, सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्‍वनाथ जडगुळे तसेच एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button