

मंचर, पुढारी वृत्तसेवा : लाखणगाव (ता.आंबेगाव)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. बाबाजी उमाजी घोडे (रा. निमगाव सावा ता . जुन्नर ) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत केंद्रप्रमुख कांताराम महादू भोंडवे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाखणगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जून २०२२ ते ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत इयत्ता सातवीचे वर्ग बाबाजी उमाजी घोडे या शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या छातीला हात लावणे, खांदयावर हात ठेवणे, कमरेत हात घालणे, मुलांना टेबलासमोर उभे करून बोलणे व मुलींना त्यांच्या खुर्चीजवळ बोलावून त्यांना स्पर्श करून बोलणे, इत्यादी प्रकार केल्याचे उघडकीस आले.
पारगाव पोलिसांनी संबंधित शिक्षकावर भा.द .वि .क ३५४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक लहू थाटे करत आहेत.