

पुढारी ऑनलाईन : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रतिभाशाली अभिनेते डॅनियल बालाजी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॅनियल बालाजी यांची 'वेट्टय्याडू विलायाडू'मधील अमूधन आणि 'वाडा चेन्नई'मधील थंबीची भूमिका प्रचंड गाजली होती. शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना छातीत दुखू लागल्याने चेन्नईच्या कोटिवाकम येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. (Tamil actor Daniel Balaji passes away) त्यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
डॅनियल बालाजी यांनी टेलिव्हिजनमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. चिठ्ठी मालिकेतील त्यांच्या भूमिकेने त्यांना सुरुवातीला ओळख मिळवून दिली. त्यांनी 'चिठ्ठी'मध्ये डॅनियलची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना डॅनियल बालाजी हे स्क्रीन नाव मिळाले. मुख्यतः डॅनियल बालाजी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते.
२०२२ मध्ये त्यांनी 'एप्रिल मधाथिल' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गौतम मेनन आणि सुर्या-ज्योतिका यांच्या 'काखा काखा'ने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. वेत्री मारनच्या 'पोल्लाधवन'मध्येही ते खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. अजित यांचा 'येन्नई अरिंधाल', सिम्बू यांचा 'अच्छम येनबधू मदामैयादा', थलपथी विजयचा 'बैरवा', धनुषचा 'वाडा चेन्नई' आणि विजयचा 'बिगिल' या काही प्रसिद्ध चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारली. ते अखेरचे तमिळ ॲक्शन ड्रामा चित्रपट 'आरियावन'मध्ये दिसले होते.
डॅनियल बालाजी यांनी तामिळ चित्रपटांव्यतिरिक्त काही मल्याळम, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
दिग्दर्शक मोहन राजा यांनी बालाजींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की ते त्यांचे प्रेरणास्थान होते.
हे ही वाचा :