युवकांचे आकर्षण असणाऱ्या ‘सनबर्न’ चे यंदा गोव्यात आयोजन
कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेले आणि युवकांचे आकर्षण असणारे सनबर्न या संगीत रजनी कार्यक्रमाचे यंदा गोव्यात आयोजन होणार आहे. गोव्यातील प्रसिद्ध अशा वागातोर किनारी भागात २८ ते ३० डिसेंबर या तीन दिवस हा संगीत महोत्सव असेल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातून पर्यटक गोव्यात येतात. या पर्यटकांना डोळ्यांसमोर ठेवूनच हा कार्यक्रम होत असतो. पर्यटनाला उपयुक्त ठरणारा हा महोत्सव पर्यटन खात्याच्या परवानगीने होत असतो.
कोरोना महामारीच्या संकटाची तिव्रता गेली दोन वर्षे अधिक राहिल्याने हा महोत्सव आयोजनास पर्यटन खात्याने मंजुरी नाकारली. त्यामुळे गेल्यावर्षी सनबर्नचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. परंतु गोव्यात ज्याप्रमाणे या सनबर्न महोत्सवाला प्रतिसाद मिळतो तसा इतर ठिकाणी मिळत नाही, असे आयोजकांना वाटते.
राजकारण्यांना आकर्षण
सनबर्न महोत्सवाचे केवळ पर्यटकांनाच आकर्षण असते असे नाहीतर राजकारण्यांनाही असते. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी मागील दोन वर्षांपूर्वी या महोत्सावात लावलेली उपस्थिती आणि धरलेला ताल समस्त गोवेकरांच्या मनातून अद्याप निघून गेलेला नाही.
ऑनलाईन तिकीट विक्री
या महोत्सवासाठी ऑनलाईन तिकीट विक्री आणि बुकिंग सुरू झाली आहे. देश विदेशातून पर्यटकांना या कार्यक्रमाला सहजणे उपस्थित राहता यावे यासाठी आयोजकांनी ऑनलाईन बुकिंग ठेवले आहे.
कोरोनाचे नियम व अटी
या महोत्सवाचे आयोजन करताना पूर्वीप्रमाणे सरसकट तिकीट विक्री होणार नाही. मर्यादित प्रवेश संख्या असल्याने उपस्थिताने कोरोनाविरुद्धच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. तरच त्याला प्रवेश दिला जाणार आहे.

