

बिडकीन: पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज (शनिवारी) औरंगाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. यावेळी बिडकीन परिसरात शिवसैनिकांमध्ये कमालीचे चैतन्य संचारल्याचे दिसले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील ही सर्वात मोठी गर्दी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, दंगली न घडविता आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर केले. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या ४० जणांना पक्षाने ओळख दिली, निवडणुकीला उमेदवारी दिली. निवडणुकीत जिंकून आल्यानंतरही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्या. तरीदेखील व्हॉट्स ॲप व फेसबुकच्या माध्यमातून ते सर्वांच्या संपर्कात होते. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांची काळजी घेतली. याच काळात विकास कामेही सुरूच ठेवली. केवळ चार ते पाच जणांच्या राक्षसी महत्वाकांक्षेला बळी पडून अन्य आमदारांनीही पक्षाशी जी गद्दारी केली. त्याचे मला आजही दुःख वाटते.
आम्ही गद्दारांवर अंधविश्वास ठेवला आणि या विश्वासाला हे गद्दार अन्याय म्हणतात. गद्दारांनी आमदारकीचे राजीनामे देऊन जनतेसमोर यावे. मग जनता जे ठरवेल ते आम्हाला मान्य राहील. राजकारणात आम्ही चांगले राहिलो मात्र, राजकारणाची पातळी खालावली आहे.
सरळ माणसं राजकारणात चालत नाही. हे मी ऐकून होतो. मात्र आता ते प्रत्यक्षात अनुभवले. तरीही चांगल्या माणसांना संधी देण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. आसाममध्ये पूर आला असताना हॉटेलमध्ये जाऊन मजामस्ती करणाऱ्यांचे खरे चेहरे आता जनतेसमोर आले आहेत. आम्ही १५ आमदार विधानसभेत गेल्यानंतर गद्दारी करणारे आमच्या नजरेत नजर मिळवू शकले नाहीत. पक्षातून गद्दार निघून गेले. मात्र खरे शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत, असे ते म्हणाले.
याप्रसंगी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयनसिंग राजपूत, अंबादास दानवे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे, युवासेना तालुकाध्यक्ष विकास गौर्डे, सरपंच अशोक धर्म, किरण गुजरसह स्थानिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?