

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इतिहासाशी संबंध असलेल्या घटकांनी जे लिखाण केले. त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार आहे, काही ठिकाणी अतिशयोक्ती तर काही ठिकाणी धादांत असत्य इतिहास मांडण्यात आला. शिवाजी महाराजांचा इतिहास धर्मांधता वाढीस लागेल अशा पद्धतीने मांडला गेला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवछत्रपतींवर कोणी केला नाही, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे लिखीत शिवचरित्र आणि विचार प्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, पी.एच.डी.चे मार्गदर्शक डॉ. पी. डी. जगताप, राजकुमार घोगरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशातील विविध राज्य मुघलांचे, पोर्तुगिजांचे, अदिलशाहीचे, यादवांचे राज्य अशा नावाने ओळखली गेली. मात्र, शिवाजी महाराजांचे राज्य भोसलेंचे राज्य म्हणून नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. ते महाराजांचा उल्लेख छत्रपती नव्हे तर कुळवाडीभूषण असा करत.
काही इतिहासकार खोटा इतिहास मांडत असताना डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे काम केले. तसेच कॉ. गोविंद पानसरे यांनीही शिवाजी महाराजांचे खरे चारित्र्य आणि वास्तववादी इतिहास युवकांच्या समोर आणण्याचे काम केले. प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर येण्यासाठी सर्व इतिहास संशोधकांची संसदेचे अधिवेशन झाल्यानंतर एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन ही पवार यांनी यावेळी दिलं.
तेव्हापासून 'दादोजी कोंडदेव' पुरस्कार बंद केला : शरद पवार
राज्य शासनातर्फे पूर्वी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुरस्कार दिला जात होता. मात्र 2008 मध्ये राज्य शासनाने दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नाही, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने सखोल अभ्यासानंतर दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा काडीमात्र संबंध नाही. शिवाजी महाराजांच्या गुरू राजमाता जिजाऊ होत्या, असा निष्कर्ष दिला. तेव्हापासून राज्य शासनाने कोंडदेव यांच्या नावे दिला जाणार पुरस्कार बंद केला.
इतिहासाची पुर्ननिर्मिती गरजेची : छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे लेखन नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. दरवेळी इतिहासकारांनी वेगवेगळा इतिहास मांडला आहे. परिणामी समाज चुकीच्या दिशेने पुढे जातो. त्यामुळे इतिहासाचे पुर्ननिर्मिती होणे गरजेचे आहे. याची सुरूवात कोकाटे यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून झाली आहे. महाराजांचे नाव आणि जयजयकार करण्यासोबतच त्यांचे विचार आत्मसात करून पुढे जाणे गरजेचे आहे.