ऊसतोड कामगार संघटनांचा संप ; 50 टक्के दरवाढीची मागणी

ऊसतोड कामगार संघटनांचा संप ; 50 टक्के दरवाढीची मागणी
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्या मजुरी दरात 50 टक्के वाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी ऊसतोड कामगारांचा बेमुदत संप सुरु झाल्याची घोषणा ऊसतोडणी वाहतूक, मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी दिली आहे. थोरे यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्याच्या महागाईचा व मजुरीचा दर पाहता पुरेसा दर नसल्याने तसेच ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीबाबतच्या कराराला तीन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या वर्षी युनियनने ऊसतोडणी कामगारांचा संप पुकारला आहे. तोडणी कामगारांच्या दरात 50 टक्के वाढ व्हावी, अशी मागणी आहे. साखर संघ व ऊसतोडणी कामगार व युनियन यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराची मुदत संपली आहे. मात्र, सध्याच्या महागाईच्या काळात सध्याच्या दरामध्ये काम करणे शक्य नाही.

उसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांच्या अनेक प्रकारच्या अडचणी असून त्यादृष्टीने मागण्या केल्या होत्या; पण त्याची दखल घेतली गेली नाही. ऊसतोडणी कामगारांच्या प्रचलित दरात वाढ करण्यात यावी, असे सांगून त्यांनी म्हटलेे आहे, की शासनाच्या निधीतून कामगारांना घरकुल मिळावे. ऊसतोडणी कामगारांच्या अड्ड्यावर स्वच्छ पाणी व वीजपुरवठा ही व्यवस्था करण्यात यावी. ऊसतोडणी कामगारांसाठी दवाखान्याची सोय शासनामार्फत कारखान्याने करावी, मुकादम व कामगारांना शासनाकडून ओळखपत्र देण्यात यावे, उसतोडणी कामगारांच्या मुलांना नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळावे, तसेच त्यांना साखर कारखान्यांमध्ये नोकरी मिळावी, अशा मागण्या थोरे यांनी केल्या आहेत.

अशी दरवाढ… आज महागाईचा काळ
ऊसतोडणी कामगारांसाठी दिल्या जाणार्‍या मजुरीच्या दरामध्ये पुरेशी वाढ नसल्याने ऊसतोड कामगारांचे नेते गहिनीनाथ थोरे पाटील यांच्यासह अन्य संघटनांनी मिळून 1986 मध्ये राज्यात मोठा संप पुकारला होता. त्या वेळी प्रत्येक किलोमीटरला डोकी सेंटरला 14 रुपये 25 पैसे, गाडी सेंटरला 16 रुपये 25 पैसे, तर टायर बैलगाडीला 19 रुपये 25 पैसे प्रतिटन दर मिळत होता. त्या वर्षी संपाच्या धास्तीने 62 टक्के दरवाढ शासनाला द्यावी लागली. त्यानंतर सातत्याने 1989, 1992, 1995, 1999, 2005, 2009, 2010, 2011, 2014, 2020 या वर्षी ऊसतोड कामगारांचे संप झाले. सध्या ऊसतोड कामगाराला डोकी सेंटरला 273 रुपये, गाडी सेंटरला 304 रुपये, तर टायर बैलगाडीला 304 रुपये प्रतिटन व प्रति किलोमीटरला 14 रुपये टनाला मिळत आहेत.

उन्नती प्रकल्प राज्यात राबवावा
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंबलबजावणी ठरल्याप्रमाणे साखर आयुक्त व साखर संघाने करावी व विम्याची रक्कम 5 लाख रुपये करावी. नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेला ऊसतोडणी कामगार उन्नती प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात यावा, अशी मागणीही थोरे यांनी केली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news