

यड्राव (इचलकरंजी); पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी येथील एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोका अंतर्गत गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्याचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती तेलनाडेचे वकील सचिन माने यांनी दिली. अवघ्या सहा महिन्यात त्याला मोका अंतर्गत जामीन मिळाला असल्यामुळे तेलनाडे समर्थकातून सोशल मीडियात इचलकरंजी महापालिकेच्या अनुषंगाने बिनविरोधचा जल्लोष सुरू आहे.
यड्राव येथे घटस्फोट प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी तसेच घरात घुसून 11 हजार रुपये लांबवल्याप्रकरणी संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे यांच्यासह अन्य संशयितांविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात २०१९ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी खंबीर भूमिका घेत तेलनाडे टोळीवर २० मे २०१९ रोजी पहिल्यांदा 'मोका' अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे एसटी सरकार गँगचे कंबरडे मोडले.
याकाळात विविध पोलिस ठाण्यात एसटी गँग विरोधात गुन्हे दाखल झाले. कारवाईच्या भीतीने तेलनाडे बंधू फरार होते. त्यांनी अनेकवेळा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केले होते. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही. 'मोका' गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या. पुणे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व अतिरिक्त विशेष न्यायाधीश ('मोका' न्यायालय) यांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी तेलनाडे बंधूंना फरार घोषित केले. त्यांना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेशही दिले होते. मात्र, ते हजर न झाल्याने त्यांच्या संपूर्ण मालमत्तेवर टाच आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
दरम्यान जानेवारी 2022 मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे येथून संजय तेलनाडे याला अटक केली होती. तेव्हापासून मोका रद्द व्हावा यासाठी तेलनाडेचे वकील उच्च न्यायालयात वेळोवेळी मागणी करत होते. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने संजय तेलनाडेयास जामीन मंजूर केली असल्याची माहिती वकील सचिन माने यांनी दिली. दरम्यान याबाबत शहापूर पोलीस ठाण्याची सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मा. उच्च न्यायालयाने कोणता आदेश दिला आहे, त्यानुसार पोलिसांची पुढील कार्यवाही होईल असे सांगितले.
संजय तेलनाडे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक, सरकारी नोकरावर हल्ला, लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग, सामूहिक बलात्कार, क्रिकेट बेटिंग, खंडणी यासह मटकाबुकी मालक म्हणून दहा गुन्हे इचलकरंजीतील शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलिस ठाणे तसेच जयसिंगपूर, करवीर पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याचा भाऊ सुनील तेलनाडे याच्यावरही दरोडा, खून आदींसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.