सगळ्यांचा ‘सातबारा’ माझ्याकडे, आपण करेक्ट कार्यक्रम करू : माजी मंत्री जयंत पाटील | पुढारी

सगळ्यांचा 'सातबारा' माझ्याकडे, आपण करेक्ट कार्यक्रम करू : माजी मंत्री जयंत पाटील

विटा; पुढारी वृत्तसेवा: मंत्री -संत्री कोणी पण होऊ देत सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे आहे. आपण करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांना दिला.

माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी आज (दि.११) रोजी सकाळी विटा शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि विटा पालिकेतील आजी माजी नगरसेवकांची भेट घेतली. विटा अर्बन पतसंस्थेच्या सभागृहात व्यापक बैठक झाली. यावेळी विटा पालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी युवा नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, विधान मतदारसंघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसनराव जानकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, तुम्ही कोणीही घाबरु नका, आता २६ च्या २६ जागा निवडून आणण्याच्या तयारीला लागा. राष्ट्रवादी पक्ष आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे. घाबरु नका, आपण करेक्ट कार्यक्रम करु. मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे, काळजी करु नका. आपण आज फार काही बोलणार नाही, मात्र, लवकरच विटेकर आणि खानापूरच्या जनतेसमोर सविस्तर बोलू , असे सुचक वक्तव्य माजी मंत्री पाटील यांनी केले.

संबंधित बातम्या

वैभव पाटील म्हणाले की, मागच्या विटा पालिकेच्या निवडणूकीत माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आपण २४ पैकी २२ सदस्य निवडून आणले. यावेळी सुद्धा आम्ही आपल्या आणि माजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच्या- सर्व जागा निवडून आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, गद्दारी अन् विश्वासघाताने कोणी मंत्री झाले तर होऊ देत. आम्हाला या गोष्टी काही नवीन नाहीत, आमचा कार्यकर्ता जराही घाबरणार नाही. तर ठामपणे निवडणूकीला सामोरा जाईल, फक्त आपले आशिर्वाद आणि मार्गदर्शन सोबत असू द्या. तुम्ही आदेश द्या नगरपालिकाच नव्हे, तर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आम्ही सर्वजण खानापूरच्या जनतेच्या आशिर्वादाने आपणास राष्ट्रवादीचा आमदारसुद्धा आणून देऊ. आता तर काहीच अडचणच नाही असेही वैभव पाटील यांनी सांगितले.

किरण तारळेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, पालिकेचे आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button