हार्दिक पंड्या म्हणाला, धोनीचा सल्ला लक्षात ठेवूनच खेळतो

हार्दिक पंड्या म्हणाला, धोनीचा सल्ला लक्षात ठेवूनच खेळतो

Published on

राजकोट ; वृत्तसंस्था : 'संघाला जशी गरज आहे, तसा खेळ कर,' हा महेंद्रसिंग धोनीने पहिल्या सामन्यात दिलेला सल्ला माझ्या डोक्यात फिट बसला आहे आणि त्यानुसारच मी माझ्या फलंदाजीची रणनीती ठरवतो, असे वक्तव्य भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने केले आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-20 सामना 82 धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्याला खेळीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने धोनीचे नाव घेत त्याचे आभार मानले. भारतासाठी जरी हा विजय खूप मोठा असला, तरी भारतीय संघाने सुरुवातीला चाहत्यांना निराश केले होते. दिनेश कार्तिकची 27 चेंडूंत 55 धावा आणि हार्दिक पंड्याची 31 चेंडूंत 46 धावांची खेळी रंगल्यामुळे भारताला 6 बाद 169 धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक जेव्हा मैदानात आला तेव्हा संघाची अवस्था सातव्या षटकात तीन बाद अशी होती. हार्दिकने तेथून पुढे शेवटपर्यंत खिंड लढवली आणि शेवटच्या पाच षटकांत फटकेबाजीही केली.

हार्दिक म्हणाला, मी गुजरात टायटन्समधून टीम इंडियात आलो; पण माझ्यासाठी काहीही बदललेले नाही. माझ्या जर्सीवर ज्या संघाचा लोगो असतो त्या संघासाठी मी सर्वस्व पणाला लावतो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, जी 'मॅचविनिंग' खेळी मी खेळतो, तशीच खेळी मला सातत्याने खेळता येऊ शकेल.

माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला मला धोनीने एक गोष्ट सांगितली होती. मी त्याला विचारले होते की, 'तू मैदानात उतरताना स्वत:वर असलेले दडपण कसे घालवतोस?' त्यावर त्याने एका वाक्यात उत्तर दिले होते की, 'जेव्हा मैदानात जाशील तेव्हा स्वत:च्या धावांकडे लक्ष न देता आपल्या संघाला आता कशाची गरज आहे याकडे लक्ष ठेव.' धोनीच्या या एका वाक्याने माझे क्रिकेटर म्हणून आयुष्यच बदलले, असा किस्सा हार्दिकने सांगितला.

धोनी त्या दिवशी जे काही बोलला ते मला खूप आवडले. धोनीचे ते वाक्य माझ्या डोक्यात पक्के बसले आणि मी त्या द़ृष्टीने विचार करायला लागलो. त्यामुळे मी आता ज्या प्रकारचा क्रिकेटर आहे, त्यात धोनीचा खूप मोठा वाटा आहे. आता मी कोणत्याही क्रमांकावर खेळायला मैदानात गेलो, तरी मी खेळाचा आणि सामन्याचा अंदाज घेतो; मग मी माझ्या फलंदाजीची रणनीती ठरवून त्याप्रमाणे खेळतो, असेही हार्दिकने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news