चेन्‍नई – केकेआर यांच्यात आयपीएलची सलामी

चेन्‍नई – केकेआर यांच्यात आयपीएलची सलामी
Published on
Updated on

मुंबई : वृत्तसंस्था
आयपीएलचा सलामीचा सामना चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 26 मार्चला खेळवण्यात येईल. इंडियन प्रीमियर लीगचे 15 वे पर्व 26 मार्च ते 29 मे 2022 या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि पुणे येथील चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम्सवर साखळी फेरीचे 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल महाराष्ट्रात खेळवण्यात येणार हे निश्‍चित झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत.

गतविजेत्या संघाला पहिला सामना खेळण्याचा मान देण्याची परंपरा आयपीएलने कायम राखली आहे. मागच्या पर्वात सीएसकेने अंतिम सामन्यात कोलकाताचा पराभव केला होता. सुरुवातीच्या सामन्यांना 25 टक्के प्रेक्षक क्षमतेला मान्यता देण्याचा विचार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सीनियर अधिकार्‍याने दिली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्‍नई सुपर किंग्ज आणि प्रथमच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मुंबई आणि पुणे येथील चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम्सवर साखळी फेरीचे 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. वानखेडे व डी. वाय. पाटील स्टेडियम्सवर प्रत्येकी 20, तर ब्रेबॉर्न व गहुंजे स्टेडियमवर प्रत्येकी 15 सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ प्रत्येकी चार सामने वानखेडे स्टेडियम व डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळतील, प्रत्येक संघ प्रत्येकी तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळेल. प्रत्येक संघ गटातील चार आणि दुसर्‍या गटातील एक अशा पाच संघांशी दोनवेळा आणि उर्वरित चार संघांशी एक वेळा खेळेल.

वांद्रे-कुर्ला, ठाण्यात होणार सराव

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदान आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर फ्रँचायझींना सराव करण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक सोमवारी जाहीर केले जाईल, महाराष्ट्र सरकारने सर्व मदत करण्याची तयारी दर्शवल्याचे बीसीसीआय खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले. बीसीसीआयच्या काही सदस्यांनी शनिवारी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी भेट घेतली. मुंबईच्या वाहतुक कोंडीतून खेळाडूंची सुटका होण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिकेची सोय देण्याचे आश्‍वासन महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news