सांगली : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींचा संपर्क तुटला : पालकांची चिंता वाढली | पुढारी

सांगली : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींचा संपर्क तुटला : पालकांची चिंता वाढली

कडेगाव, (जि.सांगली), पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील व कडेपुर येथील शिवांजली दत्तात्रय यादव या दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेल्‍या आहेत. मागील 12 तासात रशियाने युक्रेनवर हल्ला अधिक तीव्र केला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

युक्रेन सरकारने सर्वाना आपले मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे युक्रेनमधील अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे पालक व कुटुंब भयभीत झाले असून चिंता वाढली आहे.दरम्यान, भारत सरकारने विद्यार्थी मायदेशात लवकरात लवकर आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी कळकळीची विनंती पालक वर्गातून होत आहे.

कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील व कडेपुर येथील शीवांजली दत्तात्रय यादव या दोन विद्यार्थीनी युक्रेनमधील व्ही ऐन कारदिन खारकीव्ह नॅशनल युनिव्हर्सिटी येथे शिकत आहेत. आता या विद्यार्थिनींना हॉस्टेलच्याखाली बँकर मध्ये ठेवण्यात आले आहे. बाँम्‍बहल्ल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असून भारत सरकारला मदतीसाठी विनंती करत आहेत.

दरम्यान, मागील 12 तासात रशियाने युद्धाची गती वाढवली आहे. त्‍यामूळे युक्रेन सरकारने येथील स्‍थिती अथवा कोणतीही माहिती माध्यमातून देवू नये यासाठी सर्वाना आपले मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनीचा संपर्क तुटला गेला आहे.

माझ्या मुलीसह भारतातील अनेक मुली युक्रेन मध्ये अडकलेल्या आहेत .युक्रेनने मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने आज रविवार सकाळपासून त्यांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे आमची काळजी वाढली आहे. मुली अत्यंत भयभीत झाल्या असून त्यांच्याशी बोलताना अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे भारत सरकारने  माझ्यामुलीसह सर्वच विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशात आणावे.

युक्रेनमध्‍ये अडकलेल्या विद्यार्थिनींचे पालक

Back to top button