

Yashasvi Jaiswal Harsha Bhogle controversy
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीदरम्यान यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात झालेला वाद आता थेट सोशल मीडियावर पोहोचला आहे. ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगेले यांनी केलेल्या टीकेला भारतीय सलामीवीर यशस्वीने सडेतोड उत्तर दिले आहे. फर्नांडो मैदानावर काय म्हणाला हे ठाऊक नसताना कोणत्याही निष्कर्षाप्रत येऊ नका, असा सल्ला यशस्वीने भोगले यांना दिला आहे. तसेच, कुणी सीमा ओलांडली तर भारतीय संघ गप्प बसणार नाही, तर मैदानात लढून उत्तर देईल, असेही त्याने म्हटले आहे.
कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी ४५ धावांवर खेळत होता. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो याने त्याला त्रिफळाचित केले. विकेट घेतल्यानंतर फर्नांडोने आक्रमक जल्लोष केला. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या दरम्यान दोघेही एकमेकांच्या अंगावरही धावून गेले होते. यामुळे मैदानावर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
यशस्वीने दिलेल्या प्रत्युत्तरावर हर्षा भोगले यांनी नाराजी व्यक्त केली होती. बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजाने फर्नांडोशी हुज्जत घालण्याऐवजी थेट पॅव्हिलियनमध्ये जायला हवे होते, असे मत त्यांनी मांडले होते. 'क्रिकबझ'ने भोगले यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत 'जायसवालने मर्यादा ओलांडली का?' असा प्रश्न विचारला होता.
या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये स्वतः यशस्वी जायसवालने भोगले यांच्या मताचा समाचार घेतला. यशस्वीने लिहिले, "फर्नांडोने मला काय सांगितले हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर कृपया तुमचा निर्णय देऊ नका. जर कुणी मर्यादा ओलांडत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. हा भारत आहे, आम्ही लढू आणि जशास तसे उत्तर देऊ."
यशस्वीच्या या वक्तव्यामुळे मैदानातील घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे. हा वाद केवळ फर्नांडोच्या आक्रमक जल्लोषापुरता मर्यादित नव्हता, तर श्रीलंकन गोलंदाजाने काही आक्षेपार्ह भाष्य केले होते आणि त्यालाच उत्तर दिल्याचे संकेत यशस्वीच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. फर्नांडोने नक्की काय भाष्य केले होते, याचा स्पष्ट उल्लेख यशस्वीने केलेला नाही. तसेच दोघांमधील संवादाचा तपशील अद्याप समोर आलेला नसल्याने या वादाची सुरुवात नेमकी कोणत्या शब्दांनी झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.