

ISRO Rocket Launch Cost : भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम जगातील सर्वात किफायतशीर मानला जातो. मात्र, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि इटलीच्या पॉलिटेक्निको डी ट्यूरिनच्या संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासाने या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अभ्यासानुसार, भारताचा अंतराळात पेलोड (वजन) पाठवण्याचा खर्च जगातील इतर प्रमुख देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. दरम्यान, 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने' (ISRO) हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. द म्यान कमी खर्चात यशस्वी अंतराळ मोहिमा राबवण्यासाठी इस्रोची जगभरात ख्याती असताना, या नव्या अहवालामुळे अंतराळ क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
१९६० ते २०२५ दरम्यान झालेल्या ६,७४० हून अधिक रॉकेट लाँचच्या डेटाचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.२०२५ मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) १ किग्रॅ पेलोड पोहोचवण्यासाठी भारताचा अंदाजित खर्च १३,३०२ डॉलर (सुमारे १२.७३ लाख रुपये) होता.अमेरिकेत हाच खर्च प्रति किग्रॅ ३,२२५ डॉलर, जपानमध्ये ५,२८७ डॉलर, चीनमध्ये ५,८०९ डॉलर, रशियामध्ये ६,६८२ डॉलर तर युरोपमध्ये ९,८९७ डॉलर नोंदवला गेला.पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पेलोड पाठवण्याचा जागतिक सरासरी खर्च ३,८६८ डॉलर प्रति किग्रॅ आहे. त्यानुसार भारताचा खर्च अमेरिकेच्या तुलनेत तब्बल चार पटीने जास्त असल्याचा दावा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात करण्यात आला आहे.
संशोधकांच्या मते, भारतीय रॉकेटची पेलोड क्षमता कमी असणे हे प्रति किग्रॅ खर्च वाढण्याचे मुख्य कारण आहे. रॉकेट लाँच करताना काही ठराविक खर्च निश्चित असतात. रॉकेटने कमी वजन नेल्यास हा स्थिर खर्च कमी वजनावर विभागला जातो, ज्यामुळे प्रति किग्रॅ दर वाढतो. याशिवाय, अमेरिकेसारख्या देशांमध्ये पुनर्रवापर करता येणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानामुळे आणि जास्त लाँचिंगच्या अनुभवामुळे खर्च कमी झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
इस्रोने या संशोधनातील आकडेवारीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. इस्रो अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी स्पष्ट केले आहे की, संशोधनात वापरलेली आकडेवारी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे की. केवळ प्रति किग्रॅ खर्चाच्या आधारावर अंतराळ कार्यक्रमाच्या आर्थिक कार्यक्षमतेचे मूल्यमापन करता येत नाही. मोठ्या पेलोड मिशनचा विचार केल्यास भारताचा लाँचिंग खर्च अमेरिकन कंपन्यांच्या जवळपासच असतो. कमी खर्चात यशस्वी अंतराळ मोहिमा राबवण्यासाठी इस्रोची जगभरात ख्याती असताना, या नव्या अहवालामुळे अंतराळ क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.