

ICC ODI Rankings Smriti Mandhana loses No 1 spot laura wolvaardt top
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांची नवी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या नवीन क्रमवारीनुसार, भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने अव्वल स्थान गमावले आहे. द. आफ्रिकेच्या संघाची कर्णधार लॉरा वोल्व्हार्ट हिने फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद यंदा भारतीय संघाने पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी नमवत पहिल्यांदाच चषकावर नाव कोरले. या विजयानंतर आयसीसीने महिलांची नवीन क्रमवारी जारी केली आहे.
या क्रमवारीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेली भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आता दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्व्हार्ट हिने पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर कब्जा केला आहे. याव्यतिरिक्तही क्रमवारीत मोठी उलथापालथ झालेली दिसून येत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार लॉरा वोल्व्हार्ट हिला भलेही आयसीसी महिला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवता आले नाही, परंतु तिने अंतिम सामन्यात शतकी खेळी साकारली. ती एकटीच आपल्या संघासाठी मैदानात लढत राहिली होती. जोपर्यंत ती क्रीजवर टिकून होती, तोपर्यंत भारताचा विजय निश्चित झाला नव्हता, मात्र ती बाद होताच भारताने आपला विजय जवळपास पक्का केला होता.
उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्धही लॉराने शतक झळकावले होते. तिच्या सलग दोन शतकानंतरही संघाला विश्वचषक जिंकता आला नसला तरी, तिने आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान बळकट केले आहे.
क्रमवारीत लॉराने दोन स्थानांची झेप घेतली. आता तिचे रेटिंग ८१४ झाले आहे. यामुळेच भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधनाचे एक स्थानने नुकसान झाले आहे. तिला आता दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. स्मृतीचे रेटिंग आता ८११ आहे. विशेष म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंच्या रेटिंगमध्ये फारसा मोठा फरक नाही. ऑस्ट्रेलियाच्या ॲश्ले गार्डनरलाही एक स्थानाचा तोटा झाला आहे. ती ७३८ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या क्रमवारीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारी भारताची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने टॉप १० मध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. जेमिमाने एकाच वेळी नऊ स्थानांची मोठी झेप घेतली आहे. ती आता ६५८ रेटिंगसह १०व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरलाही क्रमवारीत फायदा झाला आहे, तथापि ती अजूनही पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकलेली नाही. हरमनप्रीत कौरने चार स्थानांची झेप घेतली आहे. ती ६३४ रेटिंगसह १४व्या क्रमांकावर पोहोचली आहे.