

WI vs AUS 1st Test | वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याच्या भेदक मार्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर १५९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंचांच्या काही वादग्रस्त निर्णयामुळे तिसर्या दिवशी वेस्ट इंडिजला पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिज कसाेटी संघाचा कर्णधार रोस्टन चेस (Roston Chase) याने पंचांच्या निर्णयांवर जोरदार टीका केली आहे. क्रिकेटपटू चुकला तर शिक्षा; मग पंचांना का नाही? असा सवाल करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
या सामन्यात थर्ड अंपायर ( तिसरे पंच) एड्रियन होल्डस्टॉक यांनी दिलेल्या निर्णयांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. होल्डस्टॉक यांनी या सामन्यात ५ असे निर्णय दिले आहेत, जे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, थर्ड अंपायर एड्रियन होल्डस्टॉक यांनी वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस आणि वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक-फलंदाज शाय होप या दोघांनाही वादग्रस्त परिस्थितीत बाद दिले. चेंडू बॅटला लागून पॅडवर आदळला असल्याचे दिसत असतानाही, चेसला पायचीत बाद असल्याचे घोषित केले. . तर ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने झेल घेताना चेंडू जमिनीला लागल्याचे स्पष्ट दिसत असूनही, शाय होपला झेलबाद दिले गेले. विशेष म्हणजे हे दोन्ही निर्णय चेस आणि होप दोघेही चाळीशीत धावा काढून खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर देण्यता आले होते. त्यामुळे वेस्ट इंडिजला मोठा फटका बसला.
सामन्यानंतर चेसने पंचांच्या कामगिरीबद्दल आपली निराशा लपवली नाही. तो म्हणाल की, "हा सामना माझ्यासाठी आणि संघासाठी खूपच निराशाजनक होता. सामन्यात अनेक संशयास्पद निर्णय दिले गेले. त्यापैकी एकही आमच्या बाजूने नव्हता. एक खेळाडू म्हणून तुम्ही मैदानावर असता, तुम्ही आपले सर्वस्व पणाला लावता, संघर्ष करता, पण काहीच तुमच्या मनासारखे घडत नाही. हे खूपच हृदयद्रावक ठरते. मी आणि शाय होप चांगली फलंदाजी करत होतो; मग अचानक आमच्याविरोधात काही संशयास्पद निर्णय दिले गेले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावसंख्येवर मोठी आघाडी घेण्यापासून या निर्णयांनी आम्ही सामन्यात पिछाडीवर गेलो.
तुम्हाला चुकीच्या निर्णयामुळे मैदान सोडावे लागले तर कोणालाही या निर्णयांबद्दल वाईट वाटेल. तुम्ही जिंकण्यासाठी खेळत असता, आपले सर्वस्व देत असता. चुकीचा निर्णय असतो तेव्हा असे वाटते की जणू सर्वजण तुमच्या विरोधात आहेत. हे निराशाजनक आहे कारण खेळाडू म्हणून जेव्हा आम्ही चुका करतो किंवा नियमांचे उल्लंघन करतो, तेव्हा आम्हाला कठोर शिक्षा दिली जाते; पण पंचांच्या बाबतीत काहीच होत नाही. ते फक्त एक चुकीचा किंवा संशयास्पद निर्णय देतात आणि त्यांचे आयुष्य पुढे चालूच राहते," असेही चेस म्हणाला.
" क्रिकेटमधील पंचांनी दिलेला चुकीचा निर्णय एखाद्या खेळाडूचे करिअर घडवू किंवा बिघडवू शकतो. जेव्हा खेळाडू नियमांचे उल्लंघन करतात, तेव्हा त्यांना शिक्षा होते, त्याचप्रमाणे पंचांसाठीही समान नियम असायला हवेत. जेव्हा तुमच्या विरोधात असे उघडपणे चुकीचे निर्णय दिले जातात, तेव्हा त्यासाठी काहीतरी दंडात्मक कारवाईची तरतूद असायला हवी," असेही चेसने पुढे नमूद केले.
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १८० धावांवर बाद झाला. सर्वाधिक ५९ धावा ट्रॅव्हिस हेडने केल्या. वेस्ट इंडिजच्या जेडेन सील्स आणि शमार जोसेफ यांनी नऊ बळी घेतले. वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवशी १० धावांची आघाडी मिळवली आणि अखेर १९० धावा केल्या होत्या. मात्र दुसर्या डावात ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर आणि अॅलेक्स कॅरी यांनी केलेल्या अर्धशतकांमुीळे ऑस्ट्रेलियाने ३०१ धावापर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ फक्त ३३.४ षटकांत १४१ धावांतच गारद झाला.