

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 Bat Size Checking : आयपीएलच्या 18 व्या हंगामात बऱ्याच नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. लीगच्या गेल्या काही वर्षांत प्रत्येक हंगामात काही नवीन बदल दिसून आले आहेत. तर नवीन नियम देखील लागू केले जात आहेत. या हंगामातही बदलाची परंपरा कायम राहिली आहे.
2025 च्या IPL हंगामापूर्वी, तुम्ही कधी मैदानातच पंचांना बॅटचा आकार तपासताना पाहिले होते का? कदाचित नाही. प्रथमच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यंदाच्या या प्रीमियर टी-20 लीग हंगामात सामने सुरू असताना नियमितपणे बॅटचा आकार तपासण्याचे आदेश मैदानातील पंचांना दिले आहेत. ही तपासणी कशाबद्दल केली जात आहे? बीसीसीआयने अचानक अधिकार पंचांना का दिला?
खरं तर, बॅटची तपासणी यापूर्वीही करण्यात आली आहे. प्रथम पंच किंवा सामना अधिकारी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जातात आणि बॅट तपासतात. पण आता बीसीसीआयने पंचांना सूचना दिल्या आहेत की ते त्यांच्या इच्छेनुसार सामन्यादरम्यान मैदानावर असलेल्या कोणत्याही फलंदाजाच्या बॅटचा आकार तपासू शकतात.
आयपीएलच्या या हंगामात पहिल्या दोन आठवड्यात असे काहीही दिसले नाही. पण अचानक, गेल्या रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यांमध्ये, फलंदाजांच्या बॅटची तपासणी सुरू झाली. यात हार्दिक पंड्या, फिल सॉल्ट आणि शिमरॉन हेटमायर यांच्यासह अनेक फलंदाजांच्या बॅट्स रुंदी तपासण्यात आली. नियमांनुसार बॅटची रुंदी 4.25 आणि 38 इंचांहून अधिक नसावी. पंचांकडील बॅट गेजमध्ये ती सहजपणे बसावी, अशी अट आहे. दरम्यान, पंचांनी तपासलेल्या कोणत्याही बॅटचा आकार IPL च्या अधिकृत नियमपुस्तिकेत दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसल्याचे स्पष्ट झाले.
‘पंचांकडे बॅट गेज असते. जर बॅट या गेजमध्ये बसत असेल तर बॅटचा आकार योग्य मानला जातो. पूर्वी ही तपासणी डाव सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये केली जात असे. खेळाडू त्यांच्या बॅट जमा करायचे आणि त्यांची तपासणी केली जात असे. आयसीसीने बॅटबाबत नियम घालून दिले आहेत. त्यानुसारच बॅटची लांबी, रुंदी आणि जाडी असावी लागते,’ असे एका माजी पंचांनी सांगितले आहे.
आयसीसीच्या नियमानुसार, बॅटच्या समोरील भागाची रुंदी 10.79 सेमी (4.45 इंच) पेक्षा जास्त नसावी.
मधल्या भागाची जाडी : 6.7 सेमी (2.64 इंच) पेक्षा जास्त नसावी.
बॅटच्या कडेची जाडी : 4 सेमी (1.56 इंच) पेक्षा जास्त नसावी.
बॅटची एकूण लांबी : 96.4 सेमी (38 इंच) पेक्षा जास्त नसावी.