

Anushka Sharma IPL Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगलेल्या लढती इतकीच चर्चा विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचीही झाली. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेल्या अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ती नेमकी कोणासोबत बसली होती याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा तिची जवळची मैत्रीण मालविका नायक हिच्यासोबत सामना पाहताना दिसली. मालविका आणि अनुष्का यांची मैत्री अनेक वर्षांची असून, IPL सामन्यांमध्येही त्या अनेकदा एकत्र दिसल्या आहेत. मैदानाबाहेरही दोघींची चांगली मैत्री असल्याचे अनेक प्रसंगी पाहायला मिळाले आहे.
सामन्यादरम्यान विराट कोहलीने मैदानावर काही मजेशीर हालचाली करत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. तसेच गुजरातचा कर्णधार शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराटने जल्लोष केल्यावर अनुष्काने आनंद व्यक्त करत मालविकाला मिठी मारल्याचं दृश्यही चर्चेत राहिलं.
मालविका नायक या व्यवसाय विकास (Business Development) क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनमधून MBA पदवी घेतली आहे. सोशल मीडियावर त्यांची आणि अनुष्काची मैत्री पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, RCB च्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत गुजरात टायटन्सला 20 षटकांत 155 धावांवर रोखले. आरसीबीकडून रसिख सलामने तीन, तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरने नाबाद अर्धशतक झळकावले, मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
एकीकडे मैदानावर अंतिम लढतीची रंगत होती, तर दुसरीकडे अनुष्का शर्मा आणि तिची मैत्रीण मालविका नायक यांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला.