

Vaibhav Sooryavanshi After IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना वेड लावणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा राजस्थान रॉयल्ससोबतचा प्रवास संपला असला, तरी त्याचा क्रिकेटचा प्रवास थांबलेला नाही. क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थानचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं. पण या संपूर्ण हंगामात वैभवने जे करून दाखवलं, त्यामुळे तो क्रिकेटविश्वात सर्वात चर्चेचा विषय बनला आहे. आता चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात कधी दिसणार?
वैभव आता इंडिया-अ संघासाठी श्रीलंकेत खेळताना दिसणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये दांबुला येथे होणाऱ्या ट्राई मालिकेसाठी (Tri-Series) त्याची इंडिया-अ संघात निवड झाली आहे. या मालिकेत भारत-अ, श्रीलंका-अ आणि अफगाणिस्तान-अ हे संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत तिलक वर्मा भारत-अ संघाचं नेतृत्व करणार असून, वैभव सूर्यवंशीला पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. भारत-अ संघाचा पहिला सामना 9 जून रोजी श्रीलंका-अ विरुद्ध होणार आहे.
त्यानंतर 11 जूनला अफगाणिस्तान-अ, 15 जूनला पुन्हा श्रीलंका-अ, तर 17 जूनला अफगाणिस्तान-अ विरुद्ध सामना रंगणार आहे. या मालिकेचा अंतिम सामना 21 जून रोजी खेळला जाणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होतील.
आयपीएल 2026 हा हंगाम जणू वैभव सूर्यवंशीच्या नावावरच होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अवघ्या 15 वर्षांच्या वयात त्याने अनुभवी गोलंदाजांची धुलाई करत 16 सामन्यांत तब्बल 776 धावा केल्या. त्याचा 237.30 चा स्ट्राइक रेट हा संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. या हंगामात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतकं झळकावली. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्स क्वालिफायर-2 मध्ये पोहचली.
वैभवने प्लेऑफमध्येही आपली छाप सोडली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 97 धावांची विस्फोटक खेळी, तर गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये 96 धावा करत त्याने राजस्थानच्या आशा शेवटपर्यंत जिवंत ठेवल्या. मात्र, त्याची झुंजार खेळीही राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.
वैभव सूर्यवंशीचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. 12 व्या वर्षी रणजी पदार्पण, अंडर-19 मध्ये शतक आणि आता आयपीएलमध्ये धमाका, त्यामुळे भारतीय क्रिकेटला एक नवा सुपरस्टार मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आता सर्वांच्या नजरा 9 जूनकडे लागल्या आहेत. कारण आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणारा ‘बेबी बॉस’ वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मैदानावर वादळ निर्माण करतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.