

अल अमिरात (ओमान) : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतात, तेव्हा तो सामना केवळ जय-पराजयापुरता मर्यादित न राहता भावनांचा महासंग्राम ठरतो. ओमानमधील अल अमिरात क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत अशाच एका हायव्होल्टेज सामन्यात जालंधरच्या अवघ्या १९ वर्षीय अर्जुन राजपूतने आपल्या बॅटने नवा इतिहास रचला. भारताचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतल्यानंतर मैदानात उतरलेल्या अर्जुनने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ साधत ८५ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने १०७ धावांची तडाखेबंद शतकी खेळी साकारली. या वादळी शतकाच्या जोरावर त्याने अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला भक्कम आधार दिला.
टॉस गमावून फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अवघ्या २२ धावांवर भारताने आपले तीन प्रमुख फलंदाज गमावले होते. कर्णधार लक्ष्य रायचंदानी भोपळाही न फोडता बाद झाला, तर व्ही. के. विनीत अवघ्या ८ धावांवर बाद झाला. यशवर्धन चौहानलाही केवळ एका धावेचे योगदान देता आले. याशिवाय क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळलेल्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलांची बॅटही या सामन्यात शांत राहिली. आर्यवीर सेहवाग २२, तर अन्वय द्रविड १० धावा काढून बाद झाले; दोघांनाही पाकिस्तानी गोलंदाज निकाब शफीकने बाद केले. पाकिस्तानकडून निकाबसह अली रझा आणि रिझवानुल्लाह यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. एका बाजूने ठरावीक अंतराने विकेट्स पडत असताना डावखुरा फलंदाज अर्जुन राजपूतने एकाकी किल्ला लढवत राहिला.
अवघ्या ४३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अर्जुनने पाकिस्तानी गोलंदाजीवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. अवघ्या ८० चेंडूंत आपले शतक पूर्ण करत त्याने भारताच्या डावाला गती दिली. भारताने २२ धावांवरून गाठलेल्या १७० धावांच्या टप्प्यात एकट्या अर्जुनचा १०७ धावांचा वाटा होता, यावरूनच या सामन्यावरील त्याचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित होते. वेगाने धावा जमवण्याच्या नादात तो रिझवानुल्लाहच्या गोलंदाजीवर १०७ धावांवर बाद झाला. त्याच्या या खेळीने सिद्ध केले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हे, तर असामान्य जिद्द आणि अविरत परिश्रमच कामी येतात.
अर्जुनचा इथवरचा प्रवास हा प्रचंड संघर्षमय राहिला आहे. पंजाबमधील जालंधर येथे राहणारे त्याचे वडील होती राम रस्त्यावर छोले-कुलचे विकून संसाराचा गाडा हाकतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही होती राम यांनी मुलाच्या क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नाआड कधीही गरिबी येऊ दिली नाही. मुलांच्या शिक्षणासाठी आणि सरावाच्या खर्चासाठी त्यांनी अनेकदा नातेवाईक व शेजाऱ्यांकडून कर्ज काढले; मात्र अडचणींच्या काळातही मुलाचे मनोधैर्य खचू दिले नाही. अर्जुननेही कुटुंबीयांच्या या त्यागाची जाणीव ठेवून सातव्या वर्षापासून क्रिकेटचे रीतसर धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.
जालंधर येथील हरभजन सिंग इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेटमध्ये शिष्यवृत्ती मिळवून अर्जुनने आपल्या खेळाला पैलू पाडले. मात्र, काही काळाने ही अकादमी बंद पडल्यामुळे त्याच्या क्रीडा प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला होता. अशा बिकट वळणावर त्याचे प्रशिक्षक विक्रम सिद्धू यांनी मदतीचा हात पुढे केला. सिद्धू यांनी एका नामांकित शाळेत अर्जुनचा प्रवेश करवून दिला आणि शाळा व्यवस्थापनाला त्याची संपूर्ण फी माफ करण्याची विनंती केली. व्यवस्थापनानेही ही विनंती मान्य केल्याने अर्जुनला शिक्षणासोबतच क्रिकेटचा सराव विनाअडथळा सुरू ठेवता आला.
अर्जुन हा केवळ मधल्या फळीतील आक्रमक डावखुरा फलंदाज नसून उजव्या हाताने उपयुक्त ऑफ स्पिन गोलंदाजी करण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे. यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. २०२६ च्या देशांतर्गत मोसमात पंजाबला १३ वर्षांनंतर अंडर-१९ विनू मांकड करंडक जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला. त्या स्पर्धेत त्याने ८ सामन्यांत १३९ च्या अफाट सरासरीने ३ शतकांसह ६९५ धावा कुटल्या होत्या आणि ११ बळीही मिळवले होते. याशिवाय शेर-ए-पंजाब टी-२० लीगमध्ये लुधियाना लायन्सकडून खेळताना त्याला ‘इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर’चा किताब मिळाला होता. चालू आशिया चषकातही नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ८ धावांत ३ बळी घेत भारताच्या १० गडी राखून मिळवलेल्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
आजही त्याचे वडील पहाटे उठून छोले-कुलचे विकण्याच्या कामात व्यस्त असतात. कुटुंबावरचे कर्ज आणि दैनंदिन आर्थिक आव्हाने अद्याप पूर्णपणे संपलेली नसली, तरी हाताशी एक बेकरी आणि सायकल असणाऱ्या या कुटुंबाला आपल्या मुलाने आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करत ठोकलेल्या शतकाने अभिमानाची सर्वोच्च भेट दिली आहे. ज्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न सातव्या वर्षी पाहिले होते, त्याच देशाचे नाव अर्जुनने आपल्या अफाट खेळीने जागतिक पटलावर उंचावले आहे.