

IND vs PAK U19 Asia Cup: 3 Pakistan Fielders Drop Easy Catch funny video
मस्कत (ओमान) : क्रिकेटमध्ये झेल सुटणे ही सामान्य बाब असू शकते, पण झेल सोडताना जर समोर पाकिस्तानी संघ असेल, तर त्याचं रूपांतर थेट कॉमेडी शोमध्ये होतं! अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी पोरांनी जे काही मैदानावर दिवे लावले, ते पाहून प्रेक्षकांना क्रिकेटचा सामना नाही तर एखादा कॉमेडी शो सुरू असल्याचा भास झाला. शोएब मलिक आणि सईद अजमल यांच्या ऐतिहासिक सावळ्या गोंधळाची आठवण ताजी करत, एक झेल घेताना उंच उडालेल्या चेंडूला पकडण्यासाठी तीन-तीन पाकिस्तानी खेळाडू जमले खरे, पण 'तू पकड, तू पकड'च्या नादात चेंडू मैदानावर कधी पडला हे त्यांना समजले नाही. दरम्यान या प्रकारामुळे मात्र भारताच्या काव्या पटेलला जीवनदान मिळाले.
झाले असे की, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सय्यम याच्या चेंडूवर पुढे सरसावून फटका मारण्याच्या नादात काव्या पटेलच्या बॅटची वरची कड लागली. चेंडू इतका उंच उडाला की पाकिस्तानी खेळाडूंना विचार करायला, योजना आखायला आणि रणनीती ठरवायला चिक्कार वेळ मिळाला होता. फलंदाज तंबूत परतणार ही काळ्या दगडावरची रेघ वाटत होती; पण शेवटी पाकिस्तानचे खेळाडू ते, काहीतरी 'क्रिएटिव्ह' गोंधळ घातल्याशिवाय त्यांना चैन कसे पडणार?
सुरुवातीला गोलंदाज सय्यम मोठ्या जोशात झेल घेण्यासाठी धावला. त्याला एकट्याला श्रेय मिळू नये म्हणून यष्टीरक्षक हमजा जहूर आणि आणखी एका क्षेत्ररक्षकानेही त्याच दिशेने घोडदौड केली. तिघेही त्या चेंडूखाली अगदी जवळ आले आणि तिथेच सुरू झाला खऱ्या अर्थाने कॉमेडी शो!
'तू झेल घेतोस की मी?', 'नाही नाही, तूच घे!', 'अरे मला वाटलं तू घेणार!' अशा मूक संवादांची देवाणघेवाण चालू असताना तिघांनीही एकाच वेळी माघार घेतली. अखेरच्या क्षणी तिघेही मागे सरकले आणि एखादी प्रेक्षणीय वस्तू पाहावी तशी तिघेही तो चेंडू जमिनीवर आदळताना फक्त टकमक पाहत राहिले. हात पुढे करून झेल घेण्याचे कष्टही कोणी केले नाहीत.
झेल सुटल्यानंतर गोलंदाज सय्यम डोळे वटारून क्षेत्ररक्षकांवर असा खेकसला, जणू ते दोघेच दोषी आहेत. पण गंमत म्हणजे, गोलंदाज महाशयांनी स्वतः ‘मी झेल घेतो’ हे एवढ्या उशिरा सांगितले की, बाकीच्या दोघांना नेमके काय करावे हे कळेपर्यंत चेंडू जमिनीवर विश्रांती घेत होता. एकंदरीत, गोलंदाजाने घेतलेली मेहनत, यष्टीरक्षकाची घाई आणि तिसऱ्याची उडालेली भंबेरी... या तिघांच्या 'मिळून मिसळून केलेल्या अपयशाने' भारताला हसत-खेळत एक जीवनदान मिळाले आणि प्रेक्षकांचे मात्र पोट धरून हसता हसता पुरेपूर मनोरंजन झाले.
हा प्रसंग घडताच सोशल मीडियासह संपूर्ण क्रिकेटविश्वाला शोएब मलिक आणि सईद अजमलच्या त्या सुप्रसिद्ध ‘कॅच ड्रॉप’ची आठवण झाली. पाकिस्तानच्या माजी सिनिअर्स खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जो हास्यास्पद गोंधळाचा आदर्श घालून दिला होता, तो वारसा त्यांच्या ज्युनिअर खेळाडूंनीही तितक्याच निष्ठेने आणि कसूर न करता पुढे चालवला आहे अशी टर उडवली जात आहे.