

Cricket World Records 2026 : टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठा यशस्वी रन्स चेस (धावांचा पाठलाग) करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पंजाब किंग्सच्या नावावर होता. मात्र, बुधवारी(१५ जुलै) अमेरिकेतील एका संघाने हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अमेरिकेत सध्या 'मेजर लीग क्रिकेट' (MLC) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील वॉशिंग्टन फ्रीडम संघाने पुरुष टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा रन्स चेस करून नवा इतिहास रचला आहे. वॉशिंग्टनच्या संघाने तब्बल २६७ धावांचे आव्हान अत्यंत सहजपणे पार केले. विशेष म्हणजे, या सामन्यात एमआय न्यूयॉर्कसाठी निकोलस पूरनने देखील वादळी शतक ठोकले होते, मात्र त्याची ही कामगिरी अखेर वाया गेली.
आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने स्वतःचाच जुना रेकॉर्ड मोडीत काढत नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पंजाबने २६५ धावा चेस केल्या होत्या. मात्र, आता वॉशिंग्टन फ्रीडमने एमआय न्यूयॉर्कविरुद्ध २६७ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठून नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २६२ धावांचे लक्ष्य देखील चेस केले होते; पण आा जगातील सर्वात मोठ्या रन्स चेसचा मान वॉशिंग्टन फ्रीडमच्या नावावर जमा झाला आहे.
२६७ धावांच्या या विशाल आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा स्टीव्ह स्मिथचा वॉशिंग्टन फ्रीडम संघ मैदानात उतरला, तेव्हा सुरुवातीच्या १३ चेंडूंमध्येच त्यांचे २ फलंदाज बाद झाले होते. ३ ओव्हर्सनंतर संघाची धावसंख्या २ बाद १८ अशी होती. इतक्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो आणि तोही १९व्या ओव्हरमध्येच संपेल, अशी कल्पनाही कदाचित कोणी केली नसेल. पण यानंतर वॉशिंग्टनच्या संघाने पुढच्या ३ ओव्हर्समध्ये आणखी ४३ धावा जोडल्या आणि पॉवरप्ले संपला तेव्हा धावसंख्या २ बाद ६१ अशी होती. अजूनही विजयासाठी १४ ओव्हर्समध्ये २०६ धावांची गरज होती, पण स्मिथच्या संघाने हार मानली नाही.
मैदानात एका बाजूने स्टीव्ह स्मिथ आणि दुसऱ्या बाजूने अँड्रियस गॉस यांनी विरोधी संघाच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. १० ओव्हर्समध्ये संघाने १२६ धावा केल्या आणि सामन्यात चुरस निर्माण झाली. पण त्यानंतर धावगतीला थोडा ब्रेक लागला; ११व्या ओव्हरमध्ये ६ आणि १२व्या ओव्हरमध्ये १२ धावा आल्या. मात्र, १३व्या ओव्हरमध्ये गॉसने ४ षटकार ठोकून सामन्याचे चित्रच बदलले; या ओव्हरमध्ये एकूण २९ धावा निघाल्या. १४व्या ओव्हरमध्ये स्टीव्ह स्मिथने कायरन पोलार्डला लक्ष्य करत २१ धावा वसूल केल्या. यानंतर १५व्या ओव्हरमध्ये गॉस आणि स्मिथने मिळून तब्बल ३१ धावा करत सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला.
१५ ओव्हर्स संपल्या तेव्हा वॉशिंग्टनची धावसंख्या २ बाद २२५ अशी होती. आता शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये विजयासाठी फक्त ४२ धावांची गरज होती. १६व्या ओव्हरमध्ये १६ धावा आल्यावर सामना पूर्णपणे वॉशिंग्टन फ्रीडम संघाच्या दृष्टीक्षेपात आला होता. विजयाचा उंबरठा गाठल्यावर अँड्रियस गॉस बाद झाला; पण बाद होण्यापूर्वी त्याने आपले झंझावाती शतक झळकावले होते. गॉसने अवघ्या ५१ चेंडूंमध्ये १० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने १३२ धावांची खेळी केली, तर कर्णधार स्टीव्ह स्मिथ ११० धावा करून नाबाद परतला.