

Virat Kohli Anushka Sharma Viral Video: आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सवर 5 विकेट्स राखून शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. मात्र या ऐतिहासिक विजया इतकीच चर्चा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या एका खास क्षणाची होत आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात गुजरातने RCB समोर 156 धावांचे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली सुरुवातीपासूनच आक्रमक मूडमध्ये दिसला. त्याने वेंकटेश अय्यरसोबत झंझावाती भागीदारी करत गुजरातच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
सामना निर्णायक टप्प्यात पोहोचला असताना संपूर्ण स्टेडियम ‘कोहली-कोहली’च्या घोषणांनी दणाणून गेले होते. 18व्या षटकात विराटने प्रथम चौकार ठोकला आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार मारत RCB च्या विजयावर शिक्कामोर्तब केला. विजयी षटकारानंतर मैदानात आणि डगआउटमध्ये जल्लोष झाला.
मात्र या आनंदोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विराट आणि अनुष्काच्या रोमँटिक क्षणाने. सामना जिंकल्यानंतर विराटने स्टँडकडे पाहत पत्नी अनुष्का शर्माला खास अंदाजात ‘फ्लाइंग किस’ दिला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. चाहत्यांनी या क्षणाला "फायनलमधील सर्वात सुंदर दृश्य" असं म्हणलं आहे.
या सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी ठरली. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे गुजरातच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झाला.
राशिद खानच्या फिरकीने गुजरातने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. काही झटपट विकेट्स घेत सामन्यात रंगत निर्माण केली. पण अशा दबावाच्या परिस्थितीत विराटने संयम आणि अनुभवाचा वापर करत डाव सावरला. त्याने धावगती कायम ठेवत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला, “या वर्षी आमच्या संघावर मागील हंगामासारखा दबाव नव्हता. आमच्या संघात किती क्षमता आहे याची आम्हाला जाणीव होती. आम्ही फक्त आमच्या मूलभूत क्रिकेटवर विश्वास ठेवला आणि त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे आम्ही या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ ठरलो.”
या विजयासह RCB ने आयपीएल इतिहासात नवा अध्याय लिहिला. सलग दोन वेळा विजेतेपद जिंकणारा RCB हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनंतरचा तिसरा संघ ठरला आहे. विराटचा विजयी षटकार आणि त्यानंतर अनुष्कासाठी दिलेला प्रेमळ ‘फ्लाइंग किस’ हा क्षण मात्र क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.