

Virat Kohli and Rohit Sharma BCCI Central Contract: बीसीसीआयने (BCCI) 2025–26 चे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले आहे. यामध्ये टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे कॉन्ट्रॅक्टमध्ये डिमोशन झाले आहे. आत्तापर्यंत दोघेही A+ कॅटेगरीत होते. मात्र टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयने त्यांना थेट B कॅटेगरीत टाकले आहे. इतकेच नाही, तर यंदा बीसीसीआयने A+ ही कॅटेगरीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, A+ कॅटेगरी ही तिन्ही फॉरमॅट (टेस्ट, वनडे, टी-20) नियमित खेळणाऱ्या खेळाडूंना दिली जात होती. पण सध्याच्या व्यस्त क्रिकेट वेळापत्रकात कोणीही सातत्याने तिन्ही प्रकार खेळत नसल्यामुळे ही कॅटेगरी काढून टाकण्यात आली आहे. आता खेळाडूंना फक्त A, B आणि C अशा तीन गटांत विभागण्यात आले आहे.
यंदाच्या करारात A कॅटेगरीत फक्त तीन खेळाडू आहेत —
शुभमन गिल
जसप्रीत बुमराह
रवींद्र जडेजा
जडेजाने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी टेस्ट आणि वनडेतील कामगिरीमुळे त्याला टॉप कॅटेगरीत स्थान देण्यात आले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबत सूर्यकुमार यादवलाही B कॅटेगरीत ठेवण्यात आले आहे. याच कॅटेगरीत ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. एकूण 11 खेळाडू B कॅटेगरीत आहेत.
C कॅटेगरीत अनेक युवा खेळाडू आहेत. त्यात अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, टिळक वर्मा, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, ऋतुराज गायकवाड यांच्यासह एकूण 16 खेळाडूंचा समावेश आहे.
जुन्या रचनेनुसार —
A+ कॅटेगरी – वर्षाला सुमारे 7 कोटी रुपये
A कॅटेगरी – 5 कोटी रुपये
B कॅटेगरी – 3 कोटी रुपये
C कॅटेगरी – 1 कोटी रुपये
मात्र A+ कॅटेगरी काढून टाकल्यामुळे आता नवीन वेतन रचना काय असेल, हे बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेले नाही.
या बदलांमधून बीसीसीआयने संकेत दिला आहे की आता केवळ नाव किंवा जुन्या कामगिरीच्या आधारावर नव्हे, तर सध्याचा संघामधील सहभाग आणि फॉरमॅटमधील सक्रियता पाहून खेळाडूंना मानांकन दिलं जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं क्रिकेटमधील योगदान अमूल्य असलं, तरी नव्या धोरणात त्यांचं स्थान खाली आलं आहे आणि हाच या कॉन्ट्रॅक्टचा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा आहे.