Team India U19 World Champion : युवा टीम इंडिया विश्व चॅम्पियन! ठोकला जेतेपदाचा ‘विक्रमी षटकार’

IND vs ENG U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक झंझावात, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा धुव्वा
Team India U19 World Champion : युवा टीम इंडिया विश्व चॅम्पियन! ठोकला जेतेपदाचा ‘विक्रमी षटकार’
Published on
Updated on

१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या थरारक अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडचा १०० धावांनी धूळ चारून विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयासह भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरून जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. सलामीवीर वैभव सूर्यवंशीची १७५ धावांची विश्वविक्रमी खेळी आणि त्यानंतर गोलंदाजांनी दाखवलेला संयम याच्या जोरावर भारताने क्रिकेट जगतात पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

वैभवचा 'विराट' अवतार : १७५ धावांचा रणसंग्राम

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा अक्षरशः चोथा केला. त्याने केवळ ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली, ज्यात १५ चौकार आणि १५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. विश्वचषक फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा आणि एका डावात सर्वाधिक १५ षटकार मारण्याचा ऐतिहासिक विक्रम वैभवने आपल्या नावे केला. त्याच्या या तुफानी खेळीमुळे भारताने ४११ धावांचा डोंगर उभा केला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली, ज्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचे नीतिधैर्य पूर्णपणे खच्ची केले.

इंग्लंडची अडखळती सुरुवात आणि भारतीय गोलंदाजांचा दबदबा

४१२ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना भारताच्या आर. एस. अंबरीश आणि हेनिल पटेल यांनी सुरुवातीलाच सलग दोन 'मेडन' षटके टाकून इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. अंबरीशने जोसेफ मूर्सला १७ धावांवर त्रिफळाचीत करून इंग्लंडच्या पडझडीला सुरुवात केली. त्यानंतर मधल्या षटकांत खिलन पटेलने आक्रमक बेन मेयेसला (४५) बाद करून इंग्लंडच्या आशा संपुष्टात आणल्या.

कॅलेब फाल्कनरचा एकाकी लढा आणि 'शतकी' प्रतिकार

इंग्लंडचा संघ ८ बाद २७१ अशा दयनीय अवस्थेत असताना कॅलेब फाल्कनरने मैदानाचा ताबा घेतला. त्याने केवळ ६५ चेंडूंत १११ धावांची झंझावाती खेळी करत भारताचा विजय काही काळ लांबणीवर टाकला. ४० व्या षटकात अंबरीशच्या गोलंदाजीवर त्याने तीन षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्याने एका बाजूने खिंड लढवत भारतीय गोटात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण केले होते, परंतु तो इंग्लंडला विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही.

विजयाचे शिल्पकार:

वैभव सूर्यवंशी : १७५ (८० चेंडू) - सामन्याचा नायक.

अभिज्ञान कुंडू: ४० (३१ चेंडू) - मोक्याच्या क्षणी वेगवान धावा.

आर. एस. अंबरीश: ९ षटक, ५६ धावा, ३ बळी - सुरुवातीला आणि अखेरीस महत्त्वपूर्ण यश.

खिलन पटेल: फिरकीच्या जोरावर मुख्य फलंदाजांना बाद केले.

भारताचा सुवर्ण इतिहास: सहावे जेतेपद

१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यात भारताचे वर्चस्व निर्विवाद राहिले आहे. यापूर्वी भारताने पाच वेळा ही ट्रॉफी उंचावली होती. आजच्या विजयामुळे भारताच्या खात्यात सहावे विश्वविजेतेपद जमा झाले आहे:

  • २०००: मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले जेतेपद.

  • २००८: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय.

  • २०१२: उन्मुक्त चंदच्या शतकाने मिळवून दिलेले यश.

  • २०१८: पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील निर्भेळ यश.

  • २०२२: यश धुलच्या नेतृत्वाखाली पाचवा विजय.

  • २०२६: आता आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा.

फाल्कनरचे झुंजार शतक; पराभवाच्या छायेतून इंग्लंडचा प्रतिहल्ला

भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच इंग्लंडच्या फाल्कनरने आपल्या बॅटचा तडाखा दाखवत सामन्यात पुन्हा एकदा रंगत भरली आहे. ४० व्या षटकाच्या अखेरीस इंग्लंडने ९ बाद ३०७ धावा केल्या असून, फाल्कनरच्या झंझावाती शतकामुळे भारतीय गोटात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फाल्कनरचा 'वन मॅन शो'

इंग्लंडचा संघ जेव्हा पराभवाच्या छायेत होता, तेव्हा फाल्कनरने मैदानात येत सूत्रे हाती घेतली. त्याने ४० व्या षटकात आर. एस. अंबरीशच्या गोलंदाजीवर तब्बल तीन उत्तुंग षटकार ठोकून भारतावर दडपण आणले. ३९.४ व्या चेंडूवर षटकार खेचत त्याने आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले. शतक होताच त्याने हेल्मेट काढून आणि बॅट उंचावून आपल्या जिगरबाज खेळीचे सेलिब्रेशन केले.

अंबरीशच्या षटकात १९ धावांचा पाऊस

विजयासाठी शेवटची विकेट हवी असताना अंबरीशच्या या षटकात फाल्कनरने १९ धावा कुटल्या. विशेष म्हणजे, फाल्कनरने मधल्या काही चेंडूंवर धावा घेण्यास नकार दिला आणि स्वतःच स्ट्राईकवर राहण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो जास्तीत जास्त धावा काढू शकेल. त्याने आपल्या ६५ चेंडूंच्या खेळीत १११ धावा* केल्या असून तो अद्याप नाबाद आहे.

जरी वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांची चर्चा मोठी असली, तरी फाल्कनरने अंतिम सामन्यात खेळलेली ही खेळी क्रिकेट रसिक दीर्घकाळ लक्षात ठेवतील.

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विश्वविजेतेपदाकडे कूच केली आहे. वेगवान गोलंदाज आर. एस. अंबरीशने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडत नववा बळी टिपला असून, भारत आता ऐतिहासिक विजयापासून अवघ्या एक पाऊल दूर आहे. ३८ व्या षटकाच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या ९ बाद २८१ अशी आहे.

शॉर्ट बॉलवर लम्सडेन बाद

३८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अंबरीशने पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा वापर केला. त्याने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर मॅनी लम्सडेनने 'पुल' मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या वेदांत त्रिवेदीने धावत येत एक उत्कृष्ट झेल टिपला. लम्सडेन ३ धावा काढून बाद झाल्याने इंग्लंडचा पराभव आता निश्चित मानला जात आहे.

फाल्कनरचा संघर्ष व्यर्थ?

इंग्लंडचा फलंदाज कॅलेब फाल्कनर ८५ धावांवर खेळत एका बाजूने खिंड लढवत आहे, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळताना दिसत नाहीये. अंबरीशने या षटकात केवळ ३ धावा देत सामन्यावरील भारताची पकड अधिक घट्ट केली आहे. अंबरीशने आतापर्यंत ३७ धावांत ३ महत्त्वाचे बळी मिळवून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाला मोठी गळती लागली आहे. २१ व्या षटकात कर्णधार आयुष म्हात्रेने दोन बळी घेतल्यानंतर, २२ व्या षटकात दिपेश देवेंद्रनने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फेरले. या षटकात दोन बळी गेल्यामुळे इंग्लंडची अवस्था आता ७ बाद १७७ अशी दयनीय झाली आहे.

एकाच षटकात दोन बळी; दिपेशचा 'मॅजिक स्पेल'

गोलंदाजीला परतलेल्या दिपेश देवेंद्रनने आपल्या पुनरागमनाच्या षटकात इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकूच दिले नाही:

२१.४ षटक: दिपेशने टाकलेला आखूड टप्प्याचा उसळता चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात फरहान अहमदच्या बॅटची कड लागली आणि यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूने कोणताही चुकीचा न करता सोपा झेल टिपला.

२१.६ षटक: षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सेबॅस्टियन मॉर्गनने सरळ खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिपेशने आपल्या फॉलो-थ्रूमध्ये स्वतःच्याच गोलंदाजीवर एक चित्तथरारक झेल (Caught & Bowled) घेतला. चेंडू हातातून निसटत असतानाही त्याने अत्यंत चाणाक्षपणे तो पुन्हा पकडत मॉर्गनला शून्यावर तंबूत धाडले.

इंग्लंडची शरणागती; भारतीय गोटात जल्लोष

अवघ्या काही चेंडूंच्या अंतरात इंग्लंडने आपले महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. १७१ धावांवर ३ बाद असलेल्या इंग्लंडची धावसंख्या अवघ्या ६ धावांच्या अंतरात १७७ वर ७ बाद अशी झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी लावलेल्या या शिस्तबद्ध माऱ्यापुढे इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र मैदानावर दिसत आहे.

विजयासाठी केवळ ३ विकेट्सची गरज

आता इंग्लंडची केवळ तळाची फळी मैदानात असून जेम्स मिन्टो फलंदाजीसाठी उतरला आहे. भारतीय संघाला आता ऐतिहासिक विजयासाठी केवळ ३ बळींची आवश्यकता आहे. खेळाचा ओघ पाहता, भारतीय संघ लवकरच विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

इंग्लंडच्या संघाला रोखण्यासाठी भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने स्वतः चेंडू हातात घेतला आणि पहिल्याच षटकात सामन्याचे चित्र पालटून टाकले. २१ व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यामुळे इंग्लंडचा संघ आता ५ बाद १७४ अशा अडचणीच्या स्थितीत सापडला आहे.

कर्णधाराचा पहिलाच वार: सेट झालेला डॉकिन्स माघारी

इंग्लंडसाठी धोकादायक ठरत असलेला सलामीवीर बेन डॉकिन्स (६६ धावा) क्रीझवर स्थिरावला होता. मात्र, कर्णधार आयुष म्हात्रेने आपल्या 'ऑफ ब्रेक' गोलंदाजीवर त्याला जाळ्यात ओढले. २१.४ व्या चेंडूवर डॉकिन्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या खिलाण पटेलने डाव्या बाजूला झेप घेत एक अफलातून झेल टिपला. डॉकिन्सच्या रूपाने इंग्लंडचा सर्वात मोठा आधारस्तंभ कोसळला.

मैदानात प्रचंड गोंधळ; राल्फी अल्बर्ट धावबाद

डॉकिन्स बाद झाल्यानंतर नव्याने आलेल्या राल्फी अल्बर्टला भोपळाही फोडता आला नाही. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याच्या नादात इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये मोठा गोंधळ उडाला. कालेब फाल्कनरने धाव घेण्यास नकार दिला, तोपर्यंत अल्बर्ट खेळपट्टीच्या मध्यभागी पोहोचला होता. खिलाण पटेलने तत्परतेने चेंडू यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूकडे फेकला आणि अल्बर्टला धावबाद (Run Out) करून इंग्लंडला पाचवा धक्का दिला.

अवघ्या ३ धावा आणि २ विकेट्स!

कर्णधार आयुष म्हात्रेने आपल्या या षटकात केवळ ३ धावा देत २ महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिले. या षटकापूर्वी आक्रमक वाटणारा इंग्लंडचा डाव आता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळताना दिसत आहे. सलग दोन धक्क्यांमुळे इंग्लंडच्या गोटात शांतता पसरली असून भारतीय संघ आता विजयाच्या अधिक जवळ पोहोचला आहे.

भारतीय संघाने उभारलेल्या ४१२ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे. थॉमस र्यू बाद झाल्यानंतरही इंग्लंडच्या फलंदाजांनी आपला आक्रमक पवित्रा सोडलेला नाही. सलामीवीर बेन डॉकिन्सने एका बाजूने खिंड लढवत आपले अर्धशतक पूर्ण केले असून, २० व्या षटकाअखेर इंग्लंडची धावसंख्या ३ बाद १७१ वर पोहोचली आहे.

डॉकिन्सचे तुफानी अर्धशतक

सलामीला आलेल्या बेन डॉकिन्सने १९ व्या षटकात खिलाण पटेलच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार खेचत आपले पन्नास धावा (५०) पूर्ण केले. डॉकिन्स सध्या ६५ धावांवर खेळत असून त्याने भारतीय गोलंदाजांच्या आव्हानाचा खंबीरपणे सामना केला आहे. २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने कनिष्क चौहानला मारलेला 'फ्लॅट' षटकार त्याच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरला.

फाल्कनरचा आक्रमक प्रवेश

नव्याने फलंदाजीला आलेल्या कालेब फाल्कनरने मैदानात येताच आपल्या इराद्यांची स्पष्ट कल्पना दिली. १९ व्या षटकात त्याने खिलाण पटेलला एक टोलेजंग षटकार मारला, ज्यामुळे या एकाच षटकात इंग्लंडने १६ धावा वसूल केल्या. फाल्कनरला धावबाद करण्याची एक संधी भारताला मिळाली होती, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातून चेंडू निसटल्याने त्याला जीवदान मिळाले.

भारतीय गोलंदाज दबावात?

गेल्या दोन षटकांत इंग्लंडने एकूण २९ धावा कुटल्या आहेत. कनिष्क चौहान आणि खिलाण पटेल या फिरकीपटूंना इंग्लंडचे फलंदाज आता सहजपणे खेळत असल्याचे दिसून येत आहे. डॉकिन्स आणि फाल्कनर यांच्यातील ही भागीदारी भारतासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आगामी षटकांत विकेट मिळवणे हेच भारतीय संघापुढील मुख्य आव्हान असेल.

  • धावफलक संक्षिप्त (२० षटके):

  • इंग्लंड U19: १७१/३

  • बेन डॉकिन्स: ६५* (५४ चेंडू, ६ चौकार, २ षटकार)

  • कालेब फाल्कनर: ९* (४ चेंडू, १ षटकार)

  • भारत गोलंदाजी: कनिष्क चौहान १/३५, खिलाण पटेल १/४८.

विशाल धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारतीय फिरकीपटू कनिष्क चौहानने मोठा धक्का दिला आहे. १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इंग्लंडचा सेट झालेला फलंदाज थॉमस र्यू याला बाद करून भारताने सामन्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे.

१८ वे षटक : षटकार, चौकार आणि विकेट!

या षटकात मोठी नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. थॉमस र्यूने कनिष्क चौहानला लक्ष्य करत चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार वसूल केला होता. मात्र, शेवटच्या चेंडूवर कनिष्कने चतुर गोलंदाजी केली. थॉमस र्यूने पुढे सरसावत चेंडू जोराने टोलावला, परंतु 'एक्स्ट्रा कव्हर'ला तैनात असलेल्या भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने चपळाईने एक शानदार झेल टिपला. र्यू १८ चेंडूंत ३१ धावांची वेगवान खेळी करून माघारी परतला.

ड्रिंक्स ब्रेक आणि सामन्याची स्थिती

१८ व्या षटकानंतर पंचांनी 'ड्रिंक्स ब्रेक' घोषित केला. सुरुवातीच्या दोन निर्धाव षटकांनंतर इंग्लंडने ज्या पद्धतीने प्रतिहल्ला चढवला होता, तो पाहता ही विकेट भारतासाठी अत्यंत मोलाची ठरली आहे. इंग्लंडने १८ व्या षटकाअखेर ३ बाद १४२ धावा केल्या असून त्यांना अद्याप मोठ्या धावसंख्येची गरज आहे.

मैदानावर रणनीतीची चर्चा

थॉमस र्यू आक्रमक खेळत असताना कनिष्क चौहान काहीसा दबावाखाली दिसत होता. अशा वेळी कर्णधार आयुष म्हात्रे आणि आरोन जॉर्ज यांनी कनिष्कशी चर्चा करून त्याला प्रोत्साहन दिले, ज्याचे फळ भारताला विकेटच्या स्वरूपात मिळाले. दुसऱ्या बाजूला बेन डॉकिन्स ४५ धावांवर खेळत असून तो आपल्या अर्धशतकाच्या जवळ आहे.

धावफलक संक्षिप्त (१८ षटके):

इंग्लंड U19: १४२/३

बेन डॉकिन्स: ४५* (४६ चेंडू)

थॉमस र्यू: ३१ (बाद)

कनिष्क चौहान: २-०-२२-१

अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला बेन मेयेस बाद

इंग्लंडचा प्रतिकार मोडून काढण्यात भारतीय संघाला यश आले आहे. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या बेन मेयेसला बाद करून भारताने इंग्लंडला दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा धक्का दिला. १३ व्या षटकाच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या २ बाद ९३ अशी आहे.

खिलन पटेलने उडवली दाणादाण

इंग्लंडचा फलंदाज बेन मेयेस भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत ४५ धावांपर्यंत पोहोचला होता. त्याने आपल्या २८ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि २ उत्तुंग षटकार मारून भारताची डोकेदुखी वाढवली होती. १३ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने एक जबरदस्त षटकार खेचला, मात्र पुढच्याच चेंडूवर फिरकीपटू खिलन पटेलने त्याला आपल्या जाळ्यात ओढले.

रिव्हर्स-स्वीपचा प्रयत्न फसला

लेग-स्टंपच्या बाहेर पडलेल्या चेंडूवर मेयेसने 'रिव्हर्स-स्वीप' मारण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागून हवेत उडाला. सीमारेषेवर असलेल्या हेनिल पटेलने धावत येत हा झेल टिपला आणि मेयेसचा धोकादायक डाव संपुष्टात आणला. मेयेस बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला, कारण हे गडी बाद होणे भारतासाठी सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

भारताने ठेवलेल्या ४१२ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाने आक्रमक सुरुवात केली आहे. ११ व्या षटकाच्या समाप्तीनंतर इंग्लंडने १ बाद ७८ धावा जमवल्या असून, फलंदाज बेन मेयस आणि बेन डॉकिन्स यांनी भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला आहे.

बेन मेयसची फटकेबाजी; ११ व्या षटकात १४ धावा

पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या बेन मेयसने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. ११ व्या षटकात भारताचा डावखुरा फिरकीपटू खिलाण पटेल याच्या गोलंदाजीवर मेयसने चौफेर फटकेबाजी केली. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मेयसने पुढे सरसावत 'लाँग-ऑन'च्या वरून एक उत्तुंग षटकार खेचला. त्यानंतर चौथ्या आणि शेवटच्या चेंडूवर दोन देखणे चौकार मारत त्याने या षटकात एकूण १४ धावा वसूल केल्या. मेयस सध्या २२ चेंडूंत ३४ धावांवर खेळत आहे.

भारताचे गोलंदाज दबावाखाली

भारतीय संघाने सुरुवातीला काही निर्धाव षटके टाकली होती, मात्र ८ व्या षटकापासून इंग्लंडच्या फलंदाजांनी वेग पकडला.

८ व्या षटकात हेनिल पटेलला बेन डॉकिन्सने चार चौकार मारत १६ धावा कुटल्या.

९ व्या षटकात आर.एस. अंबरीशच्या गोलंदाजीवर बेन मेयसने दोन चौकार मारून १० धावा घेतल्या.

१० व्या षटकात दिपेश देवेंद्रनला लक्ष्य करत इंग्लंडच्या फलंदाजांनी १३ धावा जमवल्या.

इंग्लंडचा प्रतिकार सुरू

विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना डगमगून न जाता इंग्लंडचे फलंदाज प्रत्येक षटकात सरासरी ७ धावांच्या गतीने खेळत आहेत. बेन डॉकिन्स (२५ धावा) मेयसला उत्तम साथ देत आहे. भारतीय गोलंदाजांना आता या भागीदारीला वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा इंग्लंडचा संघ सामन्यात अधिक शिरकाव करण्याची शक्यता आहे.

धावफलक संक्षिप्त (११ षटके):

इंग्लंड U19: ७८/१

बेन मेयस: ३४* (२२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार)

बेन डॉकिन्स: २५* (२८ चेंडू, ५ चौकार)

भारत गोलंदाजी: आर.एस. अंबरीश १/२२, खिलाण पटेल ०/१४.

इंग्लंडला पहिला मोठा धक्का; जोसेफ मूर्स त्रिफळाचीत

विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात अडखळत झाली आहे. पाचव्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज आर. एस. अंबरीशने इंग्लंडचा सलामीवीर जोसेफ मूर्सचा अडथळा दूर करत भारताला पहिले यश मिळवून दिले. ५ षटकांच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या १ बाद १९ अशी आहे.

अंबरीशचा भेदक मारा

सुरुवातीच्या दोन मेडन षटकांनंतर जोसेफ मूर्सने आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याने चौथ्या षटकात सलग तीन चौकार ठोकून इंग्लंडच्या डावाला गती दिली होती. मात्र, पाचव्या षटकात अंबरीशने पुन्हा एकदा अचूक मारा केला. ४.५ व्या चेंडूवर 'कट' मारण्याच्या नादात मूर्सच्या बॅटची आतली कड लागली आणि चेंडू थेट यष्ट्यांवर आदळला. मूर्स १७ धावा काढून माघारी परतला.

इंग्लंडच्या गोटात दडपण

मूर्सने बाद होण्यापूर्वी हेनिल पटेलच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार मारले होते, परंतु अंबरीशच्या धारदार गोलंदाजीसमोर त्याचा निभाव लागला नाही. विशेष म्हणजे, चौथ्या षटकात गोलंदाज हेनिल पटेलच्या हातून मूर्सचा एक झेलही सुटला होता, मात्र अंबरीशने इंग्लंडचा हा धोकादायक फलंदाज फार काळ टिकणार नाही याची काळजी घेतली.

सध्या बेन डॉकिन्स (२ धावा) आणि नवा फलंदाज बेन मेयेस खेळपट्टीवर आहेत.

धावफलक संक्षिप्त (५ षटके):

  • इंग्लंड U19: १९/१

  • जोसेफ मूर्स: १७ (१६ चेंडू) - बाद

  • बेन डॉकिन्स: २* (१३ चेंडू)

  • आर. एस. अंबरीश: ३-१-७-१

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; सलग दोन 'मेडन' षटकांनी इंग्लंडला जखडले

४०० धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात अत्यंत खडतर झाली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी आपल्या शिस्तबद्ध आणि भेदक माऱ्याने इंग्लंडच्या सलामीवीरांना पहिल्या दोन षटकांत एकही धाव घेऊ दिली नाही. दोन षटकांच्या समाप्तीनंतर इंग्लंडची धावसंख्या बिनबाद ० अशी आहे.

अंबरीश आणि हेनिलची भेदक गोलंदाजी

भारताकडून डावाचे पहिले षटक आर. एस. अंबरीशने टाकले. त्याने आपल्या अचूक टप्प्याने बेन डॉकिन्सला पूर्णपणे शांत ठेवले आणि एकही धाव न देता 'मेडन' षटकाने डावाची सुरुवात केली. त्यानंतर दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या हेनिल पटेलनेही आपल्या वेगाने आणि उसळीने जोसेफ मूर्सला चांगलेच त्रस्त केले. हेनिलने टाकलेल्या एका चेंडूवर मूर्सविरुद्ध पायचीतचे (LBW) जोरदार अपील झाले, मात्र तो चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याचे दिसल्याने पंचांनी ते फेटाळले.

मैदानावर भारतीय वर्चस्व

भारतीय यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू याच्याकडे चेंडू ज्या वेगाने जात आहे, त्यावरून खेळपट्टीतील उसळीचा अंदाज येत आहे. दोन्ही सलामीवीर फलंदाज चेंडूचा सामना करताना चाचपडत असल्याचे दिसत असून, भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चपळाई दाखवत धावा रोखून धरल्या आहेत. ४०० धावांच्या दडपणाखाली असलेल्या इंग्लंडसाठी ही सुरुवात अत्यंत चिंताजनक आहे.

धावफलक संक्षिप्त (२ षटके):

इंग्लंड U19: ०/०

जोसेफ मूर्स: ० (६ चेंडू)

बेन डॉकिन्स: ० (६ चेंडू)

आर. एस. अंबरीश: १-१-०-०

हेनिल पटेल: १-१-०-०

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक १७५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ९ बाद ४११ धावांचा हिमालयीन डोंगर उभा केला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या खेळीने विश्वचषकाच्या फायनलमध्ये नवा इतिहास रचला आहे.

वैभवचा 'सूर्योदय' आणि षटकारांचा पाऊस

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात काहीशी सावध झाली. सलामीवीर आरोन जॉर्ज (९) स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानावर वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ घोंघावले. वैभवने केवळ ८० चेंडूंत १७५ धावांची अविश्वसनीय खेळी केली. यात त्याने १५ चौकार आणि १५ उत्तुंग षटकार खेचले. त्याचा स्ट्राईक रेट २१८.७५ इतका होता, जो फायनलच्या दडपणाखालील सामन्यात विरळाच मानला जातो.

कर्णधाराची साथ आणि मधल्या फळीचे योगदान

वैभवला कर्णधार आयुष म्हात्रेने (५३ धावा, ५१ चेंडू) मोलाची साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची वेगवान भागीदारी रचली. आयुष बाद झाल्यानंतर वेदांत त्रिवेदी (३२) आणि विहान मल्होत्रा (३०) यांनी डावाची सूत्रे हातात ठेवली. यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूने ३१ चेंडूंत ४० धावांचे योगदान देत भारताला साडेतीनशेच्या पार नेले.

कनिष्क चौहानचा फिनिशिंग टच

अखेरच्या षटकांत इंग्लंडच्या गोलंदाजांनी काही विकेट्स मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कनिष्क चौहानने २० चेंडूंत ३७ धावांची नाबाद खेळी करत भारताला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. शेवटच्या षटकात कनिष्कने १८ धावा कुटून इंग्लंडच्या जेम्स मिन्टोची गोलंदाजी फोडून काढली.

इंग्लंडच्या गोलंदाजांची दैना

इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी आजचा दिवस विसरण्याजोगा ठरला. जेम्स मिन्टोने ६३ धावांत ३ बळी घेतले, तर अलेक्स ग्रीन आणि सेबॅस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मॅन्युएल लम्सडेनने वैभवला बाद करण्यात यश मिळवले असले तरी तोपर्यंत भारताने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली होती. लम्सडेनने ८ षटकांत ८१ धावा मोजल्या.

धावफलक थोडक्यात:

भारत U19: ४११/९ (५० षटके)

वैभव सूर्यवंशी: १७५ (८०)

आयुष म्हात्रे: ५३ (५१)

अभिज्ञान कुंडू: ४० (३१)

कनिष्क चौहान: ३७* (२०)

इंग्लंड गोलंदाजी : जेम्स मिन्टो ३/६३, अलेक्स ग्रीन २/४९, सेबॅस्टियन मॉर्गन २/७४.

आता ४१२ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करणे इंग्लंडसाठी शिवधनुष्य पेलण्यासारखे असेल. भारतीय गोलंदाज हा विजय किती लवकर खेचून आणतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताचा ४०० धावांचा टप्पा पार

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धु धु धुलाई केली. कनिष्क चौहानने शेवटच्या षटकात केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ९ बाद ४११ धावांचा हिमालयीन डोंगर उभा केला आहे.

अखेरच्या षटकात १८ धावा

डावाच्या शेवटच्या षटकात कनिष्क चौहानने आपला आक्रमक अवतार दाखवला. जेम्स मिन्टोच्या या षटकात त्याने ४, २, ४, ६ आणि २ अशा धावा वसूल करत एकूण १८ धावा कुटल्या. ४९.३ व्या चेंडूवर कनिष्कने शानदार चौकार ठोकून भारताला ४०० धावांच्या पार नेले. शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत त्याने वैयक्तिक ३७ धावांवर (२० चेंडू) नाबाद राहून डावाची सांगता केली.

रंगतदार डाव आणि इंग्लंडसमोर कठीण लक्ष्य

वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या पायावर कनिष्क चौहान (३७*) आणि अभिज्ञान कुंडू (४०) यांनी कळस चढवला. शेवटच्या काही षटकांत विकेट्स पडल्या तरी धावगती कमी होणार नाही याची काळजी भारतीय फलंदाजांनी घेतली. इंग्लंडकडून जेम्स मिन्टोने सर्वाधिक ३ बळी टिपले, मात्र त्याला शेवटच्या षटकात बसलेला फटका महागडा ठरला.

डावाचे संक्षिप्त वैशिष्ट्य:

एकूण धावसंख्या: ४११/९ (५० षटके)

कनिष्क चौहान: ३७* (२० चेंडू, ४ चौकार, १ षटकार)

अभिज्ञान कुंडू: ४० (३१ चेंडू)

इंग्लंडला विजयासाठी लक्ष्य: ४१२ धावांची गरज

भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला आहे. ४५ व्या षटकाच्या अखेरीस भारताने ६ बाद ३६७ धावा फटकावल्या असून, आता संघ ४०० धावांच्या ऐतिहासिक टप्प्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे.

कुंडूची तुफानी फलंदाजी

मधल्या फळीतील फलंदाज अभिज्ञान कुंडूने अवघ्या ३१ चेंडूंत ४० धावांची वेगवान खेळी करत भारतीय डावाला नवी उभारी दिली. ४४ व्या षटकात त्याने मॅनी लम्सडेनच्या गोलंदाजीवर आक्रमक पवित्रा घेत एकाच षटकात १९ धावा कुटल्या. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या फटकेबाजीमुळे भारताने सहजपणे ३५० धावांचा टप्पा ओलांडला. मात्र, वैयक्तिक ४० धावांवर असताना एक 'लॅप शॉट' खेळण्याच्या प्रयत्नात तो राल्फी अल्बर्टकडे झेल देऊन बाद झाला.

अंबरीशची संयमी साथ

दुसरीकडे आर. एस. अंबरीशने संयमी फलंदाजी करत १८* धावा जोडल्या आहेत. कुंडू बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कनिष्क चौहाननेही दोन धावा घेत आपले खाते उघडले आहे. ४५ व्या षटकात सेबॅस्टियन मॉर्गनच्या गोलंदाजीवर भारताने १२ धावा वसूल केल्या, ज्यामुळे धावगती कायम राहिली आहे.

इंग्लंडच्या गोटात चिंतेचे सावट

इंग्लंडच्या गोलंदाजांनी काही विकेट्स मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारतीय फलंदाजांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांची सर्व रणनीती फोल ठरताना दिसत आहे. सध्याची धावगती पाहता, भारत इंग्लंडसमोर ४०० धावांचे विशाल लक्ष्य ठेवण्याची शक्यता दाट आहे.

धावफलक :

  • भारत U19: ३६७/६ (४५ षटके)

  • अभिज्ञान कुंडू: ४० (३१ चेंडू)

  • आर. एस. अंबरीश: १८* (२३ चेंडू)

  • कनिष्क चौहान: ३* (२ चेंडू)

सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती १७५ धावांनंतर भारतीय युवा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. ३४ व्या षटकाच्या अखेरीस भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात ३०२ धावांचा टप्पा ओलांडून सामन्यावर आपले पूर्ण वर्चस्व निर्माण केले आहे. सध्या विहान मल्होत्रा (३०)* आणि वेदांत त्रिवेदी (२९)* ही जोडी मैदानावर पाय रोवून उभी आहे.

विहानला जीवदान

सामन्याच्या २९ व्या षटकात एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला. फरहान अहमदने स्वतःच्याच गोलंदाजीवर विहान मल्होत्राचा एक कठीण झेल घेतल्याचा दावा केला होता. मैदानी पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे रिप्लेमध्ये दिसल्याने तिसऱ्या पंचांनी विहानला 'नॉट आऊट' घोषित केले. या निर्णयावर इंग्लंडच्या खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली, मात्र विहानला मिळालेले हे जीवदान भारतासाठी फायदेशीर ठरले.

भारतीय फलंदाजांचा प्रतिहल्ला

वैभव बाद झाल्यानंतर खेळाची गती थोडी मंदावली होती, परंतु विहान आणि वेदांतने संयम दाखवत धावफलक हलता ठेवला. विहानने रिव्हर्स स्वीपचा सुरेख वापर करत चौकार वसूल केले, तर वेदांतनेही मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत धावगती कायम राखली. ३४ व्या षटकात राल्फी अल्बर्टच्या चेंडूवर एक धाव घेत भारताने ३०० धावांचा टप्पा पूर्ण केला.

इंग्लंडच्या अडचणीत वाढ

इंग्लंडच्या गोलंदाजांनी काही अपील केले आणि भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नशिबाची साथ आणि भारतीय फलंदाजांचे तंत्र यामुळे त्यांना यश मिळाले नाही. आता शेवटच्या १५-१६ षटकांमध्ये भारतीय संघ किती धावांची भर घालतो आणि इंग्लंडसमोर किती मोठे लक्ष्य ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धावफलक

भारत U19: ३०२/३ (३४ षटके)

विहान मल्होत्रा: ३०* (३४ चेंडू)

वेदांत त्रिवेदी: २९* (२८ चेंडू)

१९ वर्षांखालील विश्वचषक इतिहासातील सर्वात विनाशकारी फलंदाजी आज पहायला मिळाली. भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडच्या गोलंदाजीची लक्तरे वेशीवर टांगत ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. या खेळीनंतर वैभव बाद होऊन माघारी परतला असला, तरी त्याने भारतीय संघाला ऐतिहासिक धावसंख्येच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.

मैदानावर खिलाडूवृत्तीचे दर्शन

वैभव बाद झाल्यानंतर केवळ भारतीय पाठीराख्यांनीच नव्हे, तर खुद्द इंग्लंडच्या खेळाडूंनीही पुढे येऊन त्याच्याशी हस्तांदोलन करत या महान खेळीचे कौतुक केले. मैदानातील प्रेक्षकांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली. द्विशतक शतक हुकल्याचा कोणताही खेद चेहऱ्यावर न दाखवता, वैभवने अत्यंत नम्रपणे बॅट उंचावून चाहत्यांचे आभार मानले.

लम्सडेनला यश; इंग्लंडला दिलासा

इंग्लंडचा फिरकीपटू मॅनी लम्सडेनने अखेर ही जोडी फोडण्यात यश मिळवले. त्याने चेंडूचा वेग कमी करत वैभवला 'लॅप शॉट' खेळण्यास भाग पाडले, चेंडू बॅटच्या ऐवजी ग्लोव्हजला लागून यष्टीरक्षक थॉमस र्यूच्या हातात विसावला. ज्या वेगाने वैभव धावा कुटत होता, ते पाहता भारताची धावसंख्या ५०० च्या पार जाईल अशी भीती इंग्लंडला वाटत होती. या विकेटमुळे इंग्लंडला आता सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.

वैभव सूर्यवंशीची झंझावाती खेळी:

धावा: १७५

चेंडू: ८०

चौकार: १५

षटकार: १५

वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत वैभवने अवघ्या ५५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत २ बाद १६७ धावांचा डोंगर उभा केला असून सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.

मैदानावर भावूक क्षण

विसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत वैभवने आपले शतक पूर्ण केले. शतक होताच त्याने शिरस्त्राण (Helmet) काढले, डोळे मिटून प्रार्थना केली आणि त्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने बॅट उंचावत अभिवादन केले. भारतीय तंबूतील प्रत्येक खेळाडू आणि कर्मचारी या खेळीने भारावून गेला असून सर्वांनी उभे राहून वैभवचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.

इंग्लंडचे गोलंदाज हतबल

अंतिम सामन्याच्या मोठ्या दडपणाखाली वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. राल्फी अल्बर्टच्या षटकात त्याने संयम आणि चपळता दाखवत एकेरी धावा घेत ९९ वरून १०० चा टप्पा ओलांडला. वैभवच्या या वादळी खेळीने इंग्लंडच्या संघाला सध्या बचावात्मक पवित्र्यात आणले असून, मैदानावर भारतीय फलंदाजांचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळत आहे.

१९ वर्षांखालील भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आपला आक्रमक बाणा कायम राखत १५ व्या षटकाअखेर १ बाद १२२ धावांचा टप्पा गाठला. अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची कुटाई केली आहे.

वैभव-आयुषची शतकी भागीदारी

या सामन्यात भारतीय सलामीवीर ॲरॉन जॉर्ज लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची धुरा समर्थपणे सांभाळली. १५ व्या षटकात या जोडीने १०० धावांची भागीदारी पूर्ण केली. १४.३ षटकांत एक धाव घेत त्यांनी हा टप्पा गाठला, ज्यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

१०० मीटरचा 'मॉन्स्टर' षटकार

  • १५ व्या षटकात फिरकीपटू फरहान अहमदच्या गोलंदाजीवर वैभवने आपला रौद्र अवतार दाखवला:

  • १४.१ षटक: पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरच्या वरून शानदार षटकार.

  • १४.२ षटक: सलग दुसरा षटकार! सुमारे १०० मीटर लांब गेलेला हा चेंडू मैदानाबाहेर पडला. या दोन उत्तुंग षटकांमुळे भारताने धावगतीमध्ये मोठी झेप घेतली आहे.

यष्टीरक्षकाची मोठी चूक

१४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा यष्टीरक्षक थॉमस र्यू याला कर्णधार आयुष म्हात्रेला यष्टीचीत करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र, चेंडू हाता निसटल्याने आयुषला जीवदान मिळाले. आयुष सध्या ३९ धावांवर खेळत असून वैभव ७१ धावांवर नाबाद आहे. १३ व्या षटकात भारताचे सांघिक शतक (१०० धावा) पूर्ण झाले होते.

सलामीवीर ॲरॉन जॉर्ज स्वस्तात बाद झाल्यानंतर भारतीय संघ डळमळीत होईल असे वाटत असतानाच, वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले आहे. ११ व्या षटकाच्या अखेरीस भारताने १ बाद ८९ धावा केल्या असून धावगतीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.

वैभवचा धडाका: अवघ्या ३२ चेंडूत अर्धशतक

मैदानाच्या चहूकडे फटकेबाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवली. त्याने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या चालू विश्वचषकातील हे त्याचे चौथे अर्धशतक आहे. त्याने फिरकीपटू फरहान अहमदच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वैभवने बॅट उंचावून आणि आकाशाकडे पाहत आपल्या खेळीचे सेलिब्रेशन केले.

कर्णधाराची भक्कम साथ

दुसरीकडे कर्णधार आयुष म्हात्रेनेही (२८ धावा) आक्रमक पवित्रा घेत वैभवला उत्तम साथ दिली आहे. या जोडीने केवळ डावा सावरला नाही, तर स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणाऱ्या मॅनी लुम्सडेनच्या गोलंदाजीवरही प्रतिहल्ला चढवला. इंग्लंडने फिरकी गोलंदाज फरहान अहमदला पाचारण केले खरे, पण पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजांनी १० धावा वसूल करत त्याचे स्वागत केले.

धावफलक संक्षिप्त:

भारत U19: ८९/१ (११ षटके)

वैभव सूर्यवंशी: ५०* (३२ चेंडू, १ षटकार)

आयुष म्हात्रे: २८* (२३ चेंडू)

फरहान अहमद: १-०-१०-०

वैभव सूर्यवंशीने एकाच षटकात कुटल्या १८ धावा

भारतीय फलंदाजांनी आपला आक्रमक पवित्रा कायम राखला आहे. नवव्या षटकात सलामीवीर वैभव सूर्यवंशीने इंग्लंडचा नवा गोलंदाज जेम्स मिन्टो याच्यावर तुटून पडत तब्बल १८ धावा वसूल केल्या. या धडाकेबाज फटकेबाजीमुळे भारताने ९ षटकांत १ बाद ७१ धावांचा डोंगर उभा केला आहे.

सूर्यवंशीचा रौद्र अवतार

मागील दोन षटकांत भारतीय फलंदाजांनी एकूण ३३ धावा फटकावत इंग्लंडच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. नवव्या षटकाचे विश्लेषण खालीलप्रमाणे राहिले:

  • ८.२ षटक : मिन्टोचा चेंडू मिड-विकेटच्या वरून प्रेक्षणीय षटकार.

  • ८.३ षटक : शॉर्ट चेंडूवर पॉईंटच्या दिशेने हवेतून चौकार.

  • ८.५ षटक: फुल टॉस चेंडूचा फायदा घेत मिड-विकेटच्या दिशेने चौकार.

  • ८.६ षटक : 'एक्स्ट्रा कव्हर'मधून दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून सुरेख चौकार.

भारतीय संघ सुस्थितीत

वैभव सूर्यवंशी सध्या २९ चेंडूत ४२ धावांवर खेळत असून तो आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्याला कर्णधार आयुष म्हात्रेची (१८ धावा) उत्तम साथ मिळत आहे. सुरुवातीला सावध खेळणाऱ्या या जोडीने आता इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांना लक्ष्य केले आहे. जेम्स मिन्टोला आपल्या पहिल्याच षटकात १८ धावा मोजाव्या लागल्याने इंग्लंड संघ आता दबावाखाली दिसत आहे.

धावफलक संक्षिप्त:

भारत U19: ७१/१ (९ षटके)

वैभव सूर्यवंशी: ४२* (२९ चेंडू)

आयुष म्हात्रे: १८* (१४ चेंडू)

जेम्स मिन्टो: १-०-१८-०

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला सावध पवित्रा घेणाऱ्या भारतीय फलंदाजांनी आता गिअर बदलला आहे. आठव्या षटकामध्ये कर्णधार आयुष म्हात्रेने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने ८ षटकांत १ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली असून सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.

म्हात्रेची आक्रमक फटकेबाजी

सुरुवातीचे ११ चेंडू खेळूनही खाते न उघडलेल्या आयुष म्हात्रेने सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आपला इरादा स्पष्ट केला होता. मात्र, खरा थरार आठव्या षटकात पाहायला मिळाला. मॅनी लुम्सडेनच्या या षटकात म्हात्रेने ४, ४ आणि ६ अशा सलग बाउंड्रीज वसूल करत १५ धावा कुटल्या. त्याने आपल्या लाडक्या 'पुल शॉट'वर खेचलेला षटकार प्रेक्षणीय होता. म्हात्रे सध्या १४ चेंडूंत १८ धावांवर खेळत आहे.

सूर्यवंशीची साथ

दुसरीकडे, सलामीवीर वैभव सूर्यवंशीनेही अलेक्स ग्रीनच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार खेचत भारताचा धाववेग राखला आहे. त्याने आतापर्यंत २३ चेंडूंमध्ये २४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. म्हात्रे आणि सूर्यवंशी यांच्यातील भागीदारीने इंग्लंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर धाडले आहे.

धावफलक संक्षिप्त:

भारत U19: ५३/१ (८ षटके)

वैभव सूर्यवंशी: २४* (२३ चेंडू)

आयुष म्हात्रे: १८* (१४ चेंडू)

भारताला पहिला धक्का

भारताला डावाच्या चौथ्या षटकात पहिला मोठा धक्का बसला. उपांत्य फेरीतील शतकी खेळी करणारा सलामीवीर ॲरॉन जॉर्ज अवघ्या ९ धावांवर बाद झाला. भारताने ४ षटकांत १ बाद २० धावा केल्या आहेत.

ग्रीनची यशस्वी गोलंदाजी

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अलेक्स ग्रीनने आपल्या दुसऱ्या षटकात भारताची जमलेली जोडी फोडली. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जॉर्जने एक देखणा चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते, मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा 'ड्राईव्ह' मारण्याच्या प्रयत्नात तो बेन मेयेसच्या हाती झेल देऊन बसला. जॉर्जने ११ चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या मदतीने ९ धावा केल्या.

सूर्यवंशीचा प्रतिकार

दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी खेळपट्टीवर पाय रोवून उभा आहे. त्याने तिसऱ्या षटकात सेबॅस्टियन मॉर्गनच्या गोलंदाजीवर लेग साईडला एक सुरेख चौकार वसूल केला. वैभव सध्या १० धावांवर खेळत असून, जॉर्ज बाद झाल्यानंतर आता भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

धावफलक संक्षिप्त:

भारत U19: २०/१ (४ षटके)

वैभव सूर्यवंशी: १०* (१३ चेंडू)

आयुष म्हात्रे: ०* (० चेंडू)

अलेक्स ग्रीन: २-०-१२-१

वैभव सूर्यवंशीचेही चौकाराने खाते उघडले

भारताने आपली पकड मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. दुसऱ्या षटकाअखेर भारताने बिनबाद १० धावा जमवून आश्वासक सुरुवात केली.

वैभवची फटकेबाजी

पहिल्या षटकात ॲरॉन जॉर्जने चौकार ठोकल्यानंतर, दुसऱ्या षटकात वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. इंग्लंडचा नवा गोलंदाज अलेक्स ग्रीन याच्या गोलंदाजीवर वैभवने 'एक्स्ट्रा कव्हर'च्या दिशेने एक सुरेख 'ड्राईव्ह' मारत चौकार वसूल केला. वैभवने या चौकारासह आपले वैयक्तिक खाते उघडले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने आपली धावसंख्या ५ वर नेली.

वेग आणि उसळीचे आव्हान

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अलेक्स ग्रीन याने आपल्या पहिल्याच षटकात उसळी आणि वेगाचा चांगला वापर केला. एका चेंडूवर त्याने वैभवला 'अपर कट' मारण्यास प्रवृत्त केले, मात्र चेंडूने बॅटच्या वरच्या कडेला हुलकावणी दिली. भारतीय सलामीवीर सध्या खेळपट्टीवरील आव्हानांचा संयमाने सामना करत आहेत.

धावफलक संक्षिप्त :

भारत U19 : १०/० (२ षटके)

वैभव सूर्यवंशी: ५* (६ चेंडू)

आरोन जॉर्ज: ४* (६ चेंडू)

अलेक्स ग्रीन: १-०-६-०

जॉर्जचा देखणा चौकार

सलामीवीर आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी भारताचा डाव सावरण्यासाठी मैदानात उतरले आहेत. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज सेबॅस्टियन मॉर्गनने डावाचे पहिले षटक टाकले. पहिल्या तीन चेंडूंवर मॉर्गनने जॉर्जला आपल्या अचूक टप्प्याने जखडून ठेवले होते. मात्र, चौथ्या चेंडूवर जॉर्जने खेळपट्टीच्या उसळीचा फायदा घेत 'एक्स्ट्रा कव्हर'च्या दिशेने एक सुरेख चौकार ठोकून भारताचे खाते उघडले.

इंग्लंडचा आक्रमक पवित्रा

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक क्षेत्ररक्षण लावले असून दोन स्लिप्स तैनात केल्या आहेत. पहिल्याच षटकात मॉर्गनच्या चेंडूंना मिळणारा 'बाउन्स' आणि 'कॅरी' पाहता, खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या षटकाअखेर आरोन जॉर्ज ४ धावांवर खेळत असून वैभव सूर्यवंशीने अद्याप एकही चेंडू खेळलेला नाही.

धावफलक संक्षिप्त:

  • भारत U19 : ४/० (१ षटक)

  • ॲरॉन जॉर्ज : ४* (६ चेंडू)

  • सेबॅस्टियन मॉर्गन : १-०-४-०

भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी ॲरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. इंग्लंडकडून गोलंदाजीची धुरा सेबॅस्टियन मॉर्गनने सांभाळली असून त्याने पहिल्याच षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय सलामीवीरांना सावध पवित्रा घेण्यास भाग पाडले आहे. भारतीय संघाचे नेतृत्व आयुष म्हात्रे करत आहे, तर इंग्लंडच्या संघाची धुरा थॉमस र्यू याच्याकडे आहे.

मैदान आणि खेळपट्टीचा अंदाज

ज्येष्ठ समालोचक एड रेन्सफोर्ड आणि अँडी फ्लॉवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे हवामान क्रिकेटसाठी अत्यंत पोषक आहे. कमाल २८ अंश सेल्सिअस तापमान आणि अंशतः ढगाळ आकाश असून, खेळपट्टीवर सुरुवातीच्या अर्ध्या तासात चेंडूला थोडी गती (Movement) मिळण्याची शक्यता आहे. समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर हे मैदान असल्याने चेंडू हवेत वेगाने प्रवास करेल, ज्याचा फायदा फलंदाजांना मिळू शकतो.

काय म्हणाला भारतीय कर्णधार?

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे म्हणाला की, "आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल दिसत असून ती बऱ्यापैकी टणक आहे. आमचा प्रयत्न एका मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवण्याचा असेल. आतापर्यंत आमच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. आम्ही कोणताही अतिरिक्त दबाव न घेता आमचा नैसर्गिक खेळ करण्यावर भर देऊ. अंतिम सामन्यासाठी आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही."

इंग्लंडचे तगडे आव्हान

दुसरीकडे, इंग्लंडच्या संघाने या स्पर्धेत आपल्या प्रमुख खेळाडूंच्या जोरावर मजल मारली आहे. बेन मेयेस ३९९ धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर कर्णधार थॉमस रेव २९९ धावांसह त्याला उत्तम साथ देत आहे. गोलंदाजीत मॅनी लम्सडेनने आतापर्यंत १५ बळी मिळवत छाप पाडली आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, त्या सामन्यात कर्णधार रेवने ११० धावांची झुंजार खेळी साकारली होती. विशेष म्हणजे, २०२२ च्या अंतिम सामन्यातही हेच दोन संघ आमनेसामने होते, ज्यात भारताने विजय मिळवला होता.

भारतीय संघाची 'सांघिक' ताकद

भारताचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास हा वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक प्रयत्नांवर आधारलेला आहे. स्पर्धेतील सर्वाधिक धावा किंवा बळी घेणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये भारताचा एकही खेळाडू नसला, तरी प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी एका नव्या हिरोने संघाला सावरले आहे. बांगलादेशविरुद्ध अभिज्ञान कुंडू, पाकिस्तानविरुद्ध वेदांत त्रिवेदी, तर विहान मल्होत्रा आणि अ‍ॅरॉन जॉर्ज यांनी ठोकलेली शतके भारतासाठी निर्णायक ठरली. वैभव सूर्यवंशीची सातत्यपूर्ण अर्धशतके, कर्णधार आयुष म्हात्रे आणि कनिष्क चौहान यांची अष्टपैलू कामगिरी, तसेच खिलन पटेल आणि हेनिल पटेल यांची भेदक गोलंदाजी ही भारतीय संघाची जमेची बाजू आहे.

उज्ज्वल भविष्याची नांदी

भारतीय क्रिकेटची खोलवर रुजलेली पाळेमुळे या निकालातून स्पष्ट होतात. २०१६ पासून सलग सहा वेळा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम भारताच्या भक्कम 'एज-ग्रुप' सिस्टीमचे यश दर्शवतो. युवराज सिंग, विराट कोहलीपासून ते शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालपर्यंत अनेक दिग्गज या व्यासपीठावरून जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवायला निघाले आहेत. आजच्या या सामन्यातून भारतीय क्रिकेटचा 'पुढचा सुपरस्टार' कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंग्लंडचा प्रवासही तितकाच प्रभावी राहिला आहे. जो रूट, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांसारखे खेळाडू देणाऱ्या इंग्लंडच्या युवा संघातून आज कोण उदयोन्मुख तारा म्हणून समोर येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आजची एक मोठी खेळी एखाद्या खेळाडूचे नशीब पालटू शकते.

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखत जेतेपदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news