

Virat Kohli
नवी दिल्ली: रोहित शर्माला मागे टाकून विराट कोहली पुन्हा एकदा 'वनडे किंग' बनला आहे. विराटने जुलै २०२१ नंतर प्रथमच आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तब्बल १४०३ दिवसांनंतर हे स्थान मिळवले आहे.
आज (दि. १४) जाहीर झालेल्या क्रमवारीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत रोहित पहिल्या क्रमांकावर होता, तर विराट दुसऱ्या स्थानी होता. आता न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
मिचेल आणि कोहलीमध्ये केवळ १ गुणाचा फरक
विराट कोहलीने प्रदीर्घ काळानंतर वनडेत आपले वर्चस्व पुन्हा मिळवले असले तरी, न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल त्याच्यापेक्षा फारसा मागे नाही. विराट आणि मिचेल यांच्यात केवळ १ रेटिंग पॉईंटचा फरक आहे. विराटचे ७८५ रेटिंग पॉइंट्स आहेत, तर मिचेलचे ७८४ पॉइंट्स आहेत. भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील दुसरा सामना (१४ जानेवारी) आणि तिसरा सामना या दोन्ही फलंदाजांचे स्थान निश्चित करेल. जो फलंदाज चांगली कामगिरी करेल, तो अव्वल स्थानावर राहील.
वनडे क्रिकेटमध्ये भारताची ताकद आयसीसी रँकिंगवरून स्पष्ट दिसून येते, जिथे टॉप-१० मध्ये भारताचे फलंदाज आहेत:
विराट कोहली: नंबर १ (७८५ गुण)
रोहित शर्मा: नंबर ३ (७७५ गुण)
शुभमन गिल: नंबर ४ (७२५ गुण)
श्रेयस अय्यर: नंबर १० (६८२ गुण)
विराट कोहली सध्या वनडे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. वडोदरा येथे ९१ चेंडूत ९३ धावांची खेळी करणारा विराट सलग पाचव्यांदा ५० हून अधिक धावांची खेळी करण्यात यशस्वी ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे ७४ धावा करून त्याने जो फॉर्म सुरू केला होता, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १३५, १०२ आणि नाबाद ६५ धावांपर्यंत पोहोचला आणि आता वडोदरामध्ये त्याने ९३ धावांची खेळी केली.