

Virat Kohli
नवी दिल्ली: वडोदरा वनडेमध्ये भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने ९१ चेंडूत ९३ धावा केल्या, ज्यामध्ये आठ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. या उत्कृष्ट कामगिरीसाठी कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. हा त्याचा ४५ वा वनडे पुरस्कार आहे.
विराटने आजपर्यंत मैदानावर अनेक विक्रम केले आहेत. त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांइतकीच त्याच्या घरी येणाऱ्या ट्रॉफींची संख्याही मोठी आहे. पण इतक्या साऱ्या ट्रॉफी विराट नक्की ठेवतो कुठे? स्वतःसाठी त्याने वेगळी खोली बनवली आहे का? या प्रश्नांचे उत्तर स्वत: विराटनेच दिले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर बोलताना विराटने त्याच्या या यशाचे श्रेय आणि ट्रॉफींचे गुपित सांगितले. विराटला जेव्हा विचारण्यात आले की, तुला मिळालेले सर्व पुरस्कार आणि ट्रॉफी ठेवण्यासाठी तू वेगळी खोली बनवली आहे का? तेव्हा हसत विराटने उत्तर दिले, "मी माझे सर्व पुरस्कार आणि ट्रॉफी माझ्या आईकडे (गुडगावला) पाठवून देतो. तिला त्या सर्व ट्रॉफी जपून ठेवायला खूप आवडतात आणि तिला माझा अभिमान वाटतो."
३७ वर्षीय कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (ODI) आपल्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला. सर्व फॉरमॅटमध्ये मिळून २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. कोहलीने हा टप्पा आपल्या ६२४ व्या डावात गाठला. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सामन्यानंतर कोहली म्हणाला की, "देवाचा आभारी आहे, कारण देवाने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे."
जेव्हा रोहित शर्मा बाद होऊन मैदाबाहेर गेला तेव्हा चाहत्यांनी विराटच्या आगमनाचा जल्लोष केला. तेव्हा विराटला कसे वाटले? असं विचारले असता तो म्हणाला, "खरे सांगायचे तर मला अशा वेळी चांगले वाटत नाही. जो खेळाडू बाद होऊन बाहेर जात असतो, त्याच्यासाठी हे नक्कीच वेदनादायी असते. धोनीच्या बाबतीतही असेच घडताना मी पाहिले आहे. मी चाहत्यांचा उत्साह समजू शकतो, पण एक खेळाडू म्हणून मला ते थोडे अस्वस्थ वाटते."