

Virat Kohli Premanand Maharaj: रॉयल चॅलेंजर बंगळुरूने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल टायटल जिंकले. त्यानंतर त्यांनी तुफान जल्लोष केला. जवळपास दशभरापेक्षाही जास्त काळ वाट पाहणाऱ्या विराट कोहलीला आनंदाचा डबल डोस मिळाला. त्यानंतर विराट आणि अनुष्का शर्मा मैदानात तसेच हॉटेलमध्ये हे यश मुक्तपणे साजरे करताना दिसत होते.
मात्र त्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपण आपल्या गुरूला विसरलो नसल्याचे सिद्ध केले. त्यांनी वृंदावनमध्ये जाऊन प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी हे स्टार कपल अनवाणी पायाने प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी पोहचले होते. याबाबतचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विराट आणि अनुष्का यांनी काही काळ आश्रमात घालवला आणि त्यानंतर आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांचे मार्गदर्शन देखील घेतलं.
गेल्या काही वर्षापासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सातत्याने वृंदावनला भेट देत आहेत. दोन्ही स्टार्सनी आयुष्यात आध्यात्माला खूप महत्व असल्याचं अनेकवेळा सांगितलं आहे. ज्यावेळी ते आध्यात्मिक कार्यात मग्न असतात त्यावेळी ते प्रकाशझोतापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेताना जास्त उत्सुक दिसले. अनुष्का आणि विराट गाडीतून उतरल्यानंतर अनवाणी पायाने गाडीपासून आश्रमपर्यंत गेले. आश्रमात गेल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी सर्व संतांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर ते प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी कुंज आश्रमात अनवाणी चालत गेले.
ज्यावेळी विराट कोहली आश्रमाबाहेर आले त्यावेळी त्यांनी सर्व भक्तांना राधे राधे म्हणत अभिवादन केलं. त्याचबरोबर आश्रमातून परत येत असताना विराट कोहलीच्या हातात श्रीमद्भगवत पुराण देखील होते. बहुदा प्रेमानंद महाराज यांच्याकडून त्यांना ही भेट मिळाली असावी.
विराट कोहलीच्या या आध्यात्मिक यात्रा करण्याचा उद्देश हा आयपीएल २०२६ चे विजेतेपद जिंकल्यानंतर आध्यात्मिक गुरूचा आशीर्वाद घेणे हा होता. आरसीबीने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावलं आहे. त्यानंतर हे स्टार कपल वृंदावनमध्ये दाखल झालं होतं.
आरसीबीने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सनी पराभव केला होता. त्यात विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या आव्हानाचे मोठे योगदान होते.