

नवी दिल्ली : भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे व्यावसायिक क्रिकेटमधील पुनरागमन आणखी लांबणीवर पडले आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने जाहीर केलेल्या भारत ‘अ’ संघात या दोन्ही खेळाडूंचा समावेश नाही.
यामुळे, त्यांचे पुनरागमन आणखी लांबणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘अ’ गटातील ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर येथे 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर 2025 रोजी तीन सामने खेळले जाणार आहेत.
यंदाच्या आयपीएल 2025 हंगामापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या कोहली आणि रोहित शर्मा यांना ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी सराव म्हणून या भारत ‘अ’ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी अटकळ होती.
भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, रविवारी जाहीर झालेल्या भारत ‘अ’ संघात या दोन्ही वरिष्ठ फलंदाजांचा समावेश करण्यात आलेला नाही.
बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने पहिल्या वन डे सामन्यासाठी 13 सदस्यीय भारत ‘अ’ संघाची घोषणा केली असून, रजत पाटीदार कर्णधार असेल.
त्यानंतरच्या दोन सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. यात तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.