

India Pakistan match : भारत-पाकिस्तान (Pakistan vs India) हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी (दि. १४) आशिया चषकानिमित्त आमने-सामने आले. मात्र या सामन्याला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचीही किनार होती. त्यामुळेच टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळू नये, असाही एक मतप्रवाह होता. रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा सहज पराभव केला. मात्र यावेळी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासह इतर खेळाडूंनी आपला करारी बाणा दाखवत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि इतर खेळाडूंशी हस्तांदोलन (शेकहँड) न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये हस्तांदोलन झालेच नाही.विशेष म्हणजे, जेव्हा पाकिस्तानी संघ भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला, तेव्हा त्यांच्या तोंडावर दरवाजे बंद करण्यात आले. (India-Pakistan Asia Cup) टीम इंडियाच्या सडेतोड भूमिकेबाबत कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही भूमिका स्पष्ट केली.
सामन्यातील सादरीकरण कार्यक्रम आणि पत्रकार परिषदेत पाकिस्तानी खेळाडूंशी शेकहँड का केले नाही, अशी विचारणा कर्णधार सूर्यकुमारला करण्यात आली. यावेळी त्याने स्पष्ट केले की, आशिया चषक स्पर्धेत अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे. आमच्यासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा होता.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या हावभावातून पाकिस्तानला संदेश देण्याचा प्रयत्न केला. कारण आम्हाला पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काय अनुभवले, याबाबतचा संदेश देण्यासाठी एकता दाखवायची होती. आम्ही आमच्या देशाला अभिमान आणि आनंद देण्याचा प्रयत्न करू. मात्र पाकिस्तानी खेळाडूंशी शेकहँड टाळण्याची कल्पना कर्णधार सूर्यकुमार यादव याची नव्हती.
टेलिकॉम एशिया स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी खेळाडूंशी शेकहँड टाळण्याची कल्पना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मांडली. त्यांनी भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंशी शेकहँड न करण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांना त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये, अशी सूचना केली होती.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी देशात सुरू असलेल्या मागणीची चर्चा भारतीय ड्रेसिंग रूममध्येही झाली. यावर कर्णधार सूर्यकुमार आणि इतर खेळाडूंनी प्रशिक्षक गंभीर व सपोर्ट स्टाफच्या सदस्यांशी चर्चा केली.यावेळी गंभीर म्हणाले की,"सोशल मीडियाचा वापर कमी करा. अवांतर वाचन थांबवा. तुमचं काम भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणं आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये काय घडलं ते विसरू नका. पाकिस्तानी खेळाडूंशी शेकहँड करू नका. कोणतीही चर्चा करू नका. जेव्हा मैदानावर उतराल तेव्हा फक्त तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करा आणि भारतासाठी जिंका."