IND vs PAK Match Controversy : हस्तांदोलन टाळण्याने टीम इंडियावर कारवाई होणार? जाणून घ्या नियमावली

Asia Cup No Handshake Issue : यापुढेही पाकिस्तान समोर आल्यास भारताची हीच भूमिका कायम राहणार
ind vs pak asia cup match no handshake issue
Published on
Updated on

दुबई : आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना या वादासाठी जबाबदार धरत, त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.

Summary
  • हस्तांदोलन टाळल्याने पीसीबी संतप्त

  • सर्व घडामोडी सामनाधिकार्‍यांच्या निर्देशामुळेच घडल्याची पाकिस्तानची कोल्हेकुई

  • यापुढेही पाकिस्तान समोर आल्यास भारताची हीच भूमिका कायम राहणा

रविवारी सात गडी राखून मिळवलेल्या विजयानंतर, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या संघाच्या भूमिकेचे समर्थन केले होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला होता, त्यांच्या कुटुंबीयांप्रति एकजूट दाखवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्याने स्पष्ट केले.

पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामना खेळल्याबद्दल संघावर आधीच तीव्र टीका होत असताना, या नव्या वादामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आशियाई क्रिकेट परिषदेकडे (एसीसी) तक्रार केल्यानंतर आता त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी हे सध्या एसीसीचे अध्यक्ष आहेत, तर आयसीसीचे अध्यक्षपद भारताच्या जय शहा यांच्याकडे आहे. तथापि, आशिया चषक ही आयसीसीची स्पर्धा नसून तिचे व्यवस्थापन एसीसीद्वारे केले जाते.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ‘द’ (पूर्वीचे ट्विटर) वर म्हटले आहे की, सामनाधिकार्‍यांनी आयसीसीच्या आचारसंहितेचे आणि एमसीसीच्या खेळभावनेच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पीसीबीने सामनाधिकार्‍यांना आशिया चषकातून तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी पीसीबीने म्हटले होते की, पायक्रॉफ्ट यांनी नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याला भारतीय कर्णधाराशी हस्तांदोलन न करण्यास सांगितले होते.

पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नावेद चीमा यांनीही एसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पायक्रॉफ्ट यांच्या आग्रहामुळेच दोन्ही कर्णधारांमध्ये प्रथेनुसार संघ यादीची देवाणघेवाण झाली नाही.

बीसीसीआयने अद्याप पीसीबीच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु विश्वसनीय सूत्रांकडून समजते की, जर भारतीय संघ 28 सप्टेंबर रोजी होणार्‍या अंतिम सामन्यात पोहोचला, तर खेळाडू पारितोषिक वितरण मंचावर नक्वी यांच्यासोबत उपस्थित राहणार नाहीत. एसीसीचे अध्यक्ष म्हणून नक्वी यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक प्रदान केला जाण्याची शक्यता आहे.

सामन्यादरम्यान नेमके काय घडले?

सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी नेहमीच्या सराव सत्रादरम्यान एकमेकांसमोर येणे टाळले. तसेच, नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांनी आपापल्या संघांची यादी सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्याकडे सोपवली. पीसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघ व्यवस्थापक नावेद चीमा यांनी भारतीय खेळाडूंच्या हस्तांदोलन न करण्याच्या वर्तनावर तीव्र आक्षेप नोंदवला. हे वर्तन खिलाडूवृत्तीला न शोभणारे आणि खेळ भावनेच्या विरोधात आहे. याचा निषेध म्हणून आम्ही आमच्या कर्णधाराला सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेला पाठवले नाही.

बीसीसीआयचा हिरवा कंदील मिळाल्यानंतरच हस्तांदोलन टाळण्याचा निर्णय

भारतातील विरोधी पक्षांनी आणि सोशल मीडियावर या सामन्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने एकत्र येऊन ही भूमिका निश्चित केल्याचे समजते. पहलगाम हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या भावनांपेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिल्याचा आरोप केला जात होता. गंभीर आणि वरिष्ठ खेळाडू सामन्यादरम्यान कोणत्याही परिस्थितीत हस्तांदोलन न करण्याच्या निर्णयावर ठाम होते. हा निर्णय बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ‘नो हँडशेक’ हा एक धोरणात्मक निर्णय असून, जर हे संघ सुपर फोरमध्ये किंवा अंतिम सामन्यात पुन्हा समोरासमोर आले, तरीही तो कायम ठेवला जाईल.

नियमावली काय सांगते?

जर तुम्ही नियमपुस्तिका वाचली, तर त्यात प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन करण्याबद्दल कोणताही विशिष्ट नियम नाही. ही सदिच्छा व्यक्त करण्याची एक परंपरा आहे, कायदा नाही, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. जर तसा कोणताही कायदा नसेल, तर भारतीय संघ अशा प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन करण्यास बांधील नाही, ज्यांच्याशी संबंध तणावपूर्ण आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

राजकीय कारणामुळे हस्तांदोलन टाळणे नवे नाहीच!

राजकीय कारणांमुळे हस्तांदोलन न करणे हे आंतरराष्ट्रीय खेळात नवीन नाही. 2023 च्या विम्बल्डनमध्ये, युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर तिच्याशी हस्तांदोलन केले नव्हते. रशिया आणि बेलारूसने आपल्या देशावर हल्ला केल्यामुळे आपण या दोन्ही देशांच्या कोणत्याही खेळाडूशी हस्तांदोलन करणार नाही, असे स्वितोलिनाने स्पष्ट केले होते. विम्बल्डन प्रशासनाने यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली नव्हती.

काय असतील भविष्यातील समीकरणे?

पाकिस्तानसोबत खेळण्यावर तीव्र टीका होत असली, तरी भारत सरकारनेच बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत-पाक क्रिकेट सामन्यांना परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. क्रिकेटचा आता 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये अधिकृतपणे समावेश झाला आहे आणि भारताला 2030 राष्ट्रकुल आणि 2036 ऑलिम्पिक अहमदाबादमध्ये आयोजित करायचे आहेत. जर अशा भव्य स्पर्धांचे यजमानपद मिळवायचे असेल, तर बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत न खेळण्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर भारताची प्रतिमा मलीन होऊ शकते आणि यजमानपद मिळवण्याच्या संधींना मोठा धक्का बसू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news