

Vinesh Phogat loses trials
नवी दिल्ली: महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मीनाक्षी गोयतविरुद्ध ४-६ असा पराभव स्वीकारत विनेश फोगटचे आशियाई क्रीडा स्पर्धा चाचणी (Asian Games selection trials) मधील आव्हान संपुष्टात आले आहे. या पराभवासह विनेशचे २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न भंगले. एकीकडे उपांत्य फेरीत विनेशचा प्रवास संपला, तर दुसरीकडे अंतिम फेरीत पोहोचलेली मीनाक्षी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिकिटाच्या शर्यतीत कायम आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात विनेश आणि मीनाक्षी यांच्यात प्रत्येक गुणासाठी जोरदार लढत पाहायला मिळाली. मात्र, सामन्याच्या निर्णायक क्षणांमध्ये मीनाक्षीने आपला संयम राखला आणि मोक्याच्या वेळी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. या कष्टाने मिळवलेल्या विजयासह मीनाक्षीने अंतिम फेरीत धडक मारली.
आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीट मिळवण्याच्या इराद्याने मॅटवर उतरलेल्या विनेशसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. असे असले तरी, मॅटवरून बाहेर पडताना या माजी जागतिक विजेत्या आणि ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूने उपस्थित क्रीडाप्रेमींचे मन जिंकले."मैं फिर आऊंगी (मी पुन्हा परत येईन)," असे म्हणत विनेशने क्रीडा संकुलातून काढता पाय घेतला, ज्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
यापूर्वी, शनिवारी सकाळी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर विनेशने स्पर्धात्मक कुस्तीत दणक्यात पुनरागमन केले होते. सुरुवातीच्या दोन कठीण लढती जिंकत तिने अंतिम चार (उपांत्य फेरी) मध्ये जागा मिळवली होती.पेरिस ऑलिम्पिकमधील हृदयद्रावक प्रवासानंतर पहिल्यांदाच मॅटवर उतरलेल्या विनेशने उप-उपांत्यपूर्व फेरीत (Round of 16) ज्योतीविरुद्ध ७-१ असा एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला तिला 'पॅसिव्हिटी' (निष्क्रियता) चेतावणी मिळाली असली, तरी लवकरच तिने सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यादरम्यान मॅट १ वरील रिव्ह्यू मॉनिटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सामन्यात सुमारे १० मिनिटांचा विलंब झाला होता.
निशूविरुद्ध झालेली उपांत्यपूर्व फेरीची लढत कमालीची नाट्यमय ठरली. सामन्यात अवघ्या तीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना विनेश ०-५ अशी मागे होती. मात्र, त्यानंतर तिने जबरदस्त पुनरागमन केले. विनेशने प्रतिस्पर्ध्याला चीतपट करण्याचा (Pinning) प्रयत्न करत असताना पंचांनी सामना सुरू ठेवण्याऐवजी तिला चार गुण दिले. आपल्याला अधिक गुण मिळायला हवे होते, या विश्वासाने विनेशने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले. हा रिव्ह्यू तिच्या बाजूने लागला.त्यानंतर काही वेळातच तिने 'आर्म थ्रो' (हॅन्ड थ्रो) मारला, ज्यासाठी तिला चार ऐवजी केवळ दोनच गुण मिळाले. तिचे दुसरे चॅलेंज अपयशी ठरले, परंतु तोपर्यंत तिने ५-५ अशी बरोबरी करत ६-५ अशी आघाडी घेतली होती. यानंतर या सामन्यात मोठा वाद निर्माण झाला. पंचांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी विनेशचे पती सोमवीर राठी थेट मैदानात (Field-of-play area) उतरले. अधिकाऱ्यांनी वचन दिलेले फुटेज दाखवण्यास नकार दिल्यानंतर तणाव आणखी वाढला. या वादाचे रूपांतर भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंग आणि विनेशच्या समर्थकांमधील शाब्दिक चकमकीत झाले.या संपूर्ण गोंधळातही विनेशने आपला संयम ढळू दिला नाही आणि निशूवर ७-६ अशी मात करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, काही वेळाने मीनाक्षीने तिचे हे आव्हान संपुष्टात आणले.
या निवड चाचणीपूर्वी विनेश आणि कुस्ती महासंघ (WFI) यांच्यात नवा वाद समोर आला होता.शनिवारी सकाळी विनेशला सांगण्यात आले होते की, तिला केवळ ५० किलो वजनी गटातच खेळण्याची परवानगी दिली जाईल. कारण तिने पॅरिस ऑलिम्पिकसह तिच्या मागील चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा याच वजनी गटात खेळल्या होत्या. यावर विनेशने तीव्र आक्षेप घेतला आणि महासंघावर भेदभावाचा आरोप करत ५३ किलो वजनी गटातच खेळण्याचा हट्ट धरला. हा वाद वाढल्यानंतर शेवटी WFI अध्यक्ष संजय सिंग यांनी मध्यस्थी केली आणि तिला ५३ किलो वजनी गटाच्या चाचणीत उतरण्याची परवानगी दिली.