

Sunny Phulmali Asian Youth Wrestling Championship
राजू म्हस्के
कडा : जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने काहीही अशक्य नसते, याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येतच असते. कितीही हलाखीची परिस्थिती असली आणि माणसानं मनात जिद्द ठेवली की, त्याला यश हे मिळतंच. अशीच जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मराठवाड्याच्या मातीतील आष्टी तालुक्यातील डोंगरकपऱ्यांमध्ये वसलेल्या पाटसरा येथील मुलाने यशाला गवसणी घातली आहे. नंदीबैल घेऊन फिरणाऱ्याच्या १७ वर्षीय मुलाने पुण्यातील लोहगाव येथे झोपडीत राहून कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले.
कुस्तीपटू सनी फुलमाळी याने बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. सुभाष फुलमाळी हे कुटुंबीयांना पुण्यातील लोहगाव येथे कामानिमित्त घेऊन आले. त्यांनी पडेल ते काम करून तीन मुलांना लहानाचे मोठ केले. आपल्याला कुस्ती क्षेत्रात नाव करता आले नाही. पण आपल्या तीन मुलांनी कुस्तीमध्ये नाव कमवावे, त्यासाठी सुभाष यांनी पाला बाहेर कुस्तीचं मैदान तयार करून मुलांना कुस्तीचाचे धडे देण्यास सुरुवात केली. याच पालाच्या बाहेरुन कुस्तीचा सुरू झालेला सनीचा प्रवास थेट बहरीन येथे झालेल्या एशियन युथ गेम पर्यंत जाऊन पोहोचला.
आष्टी तालुक्यात सतत पडणारा दुष्काळ, बेरोजगारी, अशा संकटांना कंटाळून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह सुभाष १५ वर्षापूर्वी पुण्यातील लोहगाव येथे कामाच्या शोधात आले. कुटुंबीयांचा मूळचा व्यवसाय नंदीबैल घेऊन गावोगावी भटकणे. त्यातून कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह चालत असे.
सनीचे आजोबा आणि वडिलांना कुस्तीची आवड, दोन्ही मोठे भाऊ आणि स्वतःला कुस्तीची आवड निर्माण झाली. त्यानंतर सनी देखील कुस्तीकडे आकर्षित झाला. त्याठिकाणी तिघां भावांनी चांगली कुस्ती खेळता यावी, यासाठी वडिलांनी झोपडीच्या बाहेरच मैदान तयार केले. त्या ठिकाणी दररोज सकाळी सराव सुरू झाला. पण काही दिवसांनी सनीने रायबा तालीम येथे सराव करायला सुरूवात केली. त्यानंतर संदीप भोंडवे यांच्या जाणता राजा या तालमीत कुस्तीचे धडे गिरवले.
अंगी असलेले चिकाटी जिद्द परिश्रम घेण्याची तयारी पाहून संदीप भोंडवे यांना त्याची कुस्ती आवडली आणि घराची हालाखीची परिस्थिती ओळखून त्यांनी सनीला दत्तक घेतले. मागील आठ वर्षापासुन ते सर्व खर्च करीत आले. एकीकडे दररोजचा सराव सुरू होता. तर दुसर्या बाजूला आई वडिलांचे कष्ट दिसत होते. कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमवायचे हाच उद्देश डोळ्यासमोर होता. त्यानुसार दररोज सराव सुरू ठेवला. तर दुसर्या बाजूला शिक्षण देखील सुरू ठेवले.
एकामागून एक स्पर्धां जिंकत गेल्यानंतर त्यांची बहरीन येथे होणार्या एशियन युथ गेमसाठी निवड झाली. बहरीन येथे झालेल्या एशियन स्पर्धेत इराक, इरान, जपान, कोरिया आदी देशातील खेळाडू सोबत कुस्ती केली. इराणच्या पैलवानासोबत कुस्ती झाली आणि ती कुस्ती जिंकली आणि सुवर्णपदक जिंकले.
इराणच्या पैलवानांला चितपट करून सुवर्णपदक मिळाल्याचे फोन करून आईवडिलांना सांगितल्यावर फोनवरच आई वडील रडू लागले,
बहरीन येथे सुवर्णस्वप्न साकार झाल्यानंतर पुढचे ऑलम्पिक स्पर्धा जिंकण्याचे आहे आणि त्यासाठी अधिक कष्ट घेणार असल्याचे सनीने सांगितले.
आमदार सुरेश धस यांनी सनीचे कौतुक करताना म्हटले, "अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणं ही मोठी कामगिरी आहे.सनीने आपल्या मेहनती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आष्टीचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्याचे यश ग्रामीण तरुणांना प्रेरणा देणारं आहे.