

दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्ती सध्या आपल्या फिरकीच्या जादूने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवत आहे. आयसीसीने (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत वरुणने असा पराक्रम केला आहे, जो आजवर भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला अगदी जसप्रीत बुमराहलाही जमलेला नाही.
वरुण चक्रवर्ती आता टी-२० क्रिकेटमध्ये जगातील नंबर-१ गोलंदाज तर आहेच, पण त्याने रेटिंग पॉइंट्सच्या बाबतीतही इतिहास रचला आहे. वरुणच्या खात्यात सध्या ८१८ रेटिंग पॉइंट्स जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, टी-२० क्रमवारीत ८०० रेटिंग पॉइंट्सचा टप्पा ओलांडणारा तो भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. बुमराहने २०१७ मध्ये ७८३ रेटिंग पॉइंट्स मिळवले होते. वरुणने आता बुमराहला मागे टाकले आहे.
द. आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत वरुणची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. तीन सामन्यांत त्याने आतापर्यंत ६ बळी मिळवले आहेत. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने अवघ्या ४ षटकात ११ धावा देऊन २ बळी टिपले. सातत्यपूर्ण कामगिरी आणि किफायतशीर गोलंदाजीमुळे त्याच्या रेटिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.
वरुण चक्रवर्तीसाठी २०२५ हे वर्ष स्वप्नवत ठरत आहे. या वर्षात त्याने आतापर्यंत १९ सामन्यात ३२ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट केवळ ६.६९ इतका राहिला आहे, जे टी-२० फॉरमॅटमध्ये अतिशय प्रभावी मानले जाते.
वरुणसोबतच इतर भारतीय खेळाडूंनीही रँकिंगमध्ये प्रगती केली आहे. अर्शदीप सिंहला ४ स्थानांचा फायदा झाला असून तो आता १६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीप यादवही एका स्थानाच्या सुधारणेसह २३ व्या स्थानावर आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराह मात्र तीन स्थानांनी घसरून २८ व्या क्रमांकावर गेला आहे.