

IPL 2026 auction
अबुधाबी : जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकिब दार याने आज (दि.१६) आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात बाजी मारली. त्याला दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने तब्बल ८.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. केवळ ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीपासून सुरुवात करत त्याने ८.४० कोटींपर्यंत मजल मारली.
अकिबसाठी ३० लाख रुपयांच्या मूळ किंमतीपासून बोली लावण्यासाठी सुरुवात झाली. यानंतर दिल्ली आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात जोरदार बोलीची लढत सुरू झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांनीही यामध्ये उडी घेतली. मात्र, अखेरीस ८.४० कोटी रुपयांना दिल्ली कॅपिटल्सने अकिबला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. मिचेल स्टार्कसारखा अनुभवी गोलंदाज असलेल्या दिल्ली-आधारित फ्रँचायझीला अकिबच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीच्या मोठे बळ मिळाले आहे.
काश्मीरमधील बारामुल्ला येथे जन्मलेल्या या २८ वर्षीय वेगवान गोलंदाजाला सुरुवातीला वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर व्हायचे होते. मात्र, "बारामुल्लाचा डेल स्टेन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकिबचे आयुष्य वेगळ्याच वळणावर आले. त्याने जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (JKCA) टेस्ट दिली. मात्र त्याची निवड झाली नाही. अखेरीस, २०१६ मध्ये त्याची JKCA च्या चाचण्यांमध्ये निवड झाली.
अकिबने २०२० मध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. कर्नाटकविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत तीन बळी घेतल्याने त्याचे नाव चर्चेत आले. मात्र दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळाला नाही; पण तो संघासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला हे विशेष. २०२०मध्ये त्याने केवळ सात सामन्यांत १८.५० च्या सरासरीने २४ बळी मिळवून आपल्या मोहिमेचा समारोप केला. दोनवेळा पाच बळी घेण्याचा पराक्रमाचाही समावेश होता.
पुढील दोन वर्षांत अकिबने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये एकही सामना खेळला नाही. त्याची क्रिकेट कारर्कीद संपणार अशी चर्चाही सुरु झाली होती; पण केवळ एकाच हंगामाने त्याचे संपूर्ण करिअर बदलले. मागील रणजी ट्रॉफी हंगामात अकिबने केवळ नऊ सामन्यांत १३.०८ च्या उत्कृष्ट सरासरीने ४९ बळी घेत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.
२०२५-२६ च्या दुलिप ट्रॉफी हंगामातही त्याची चमकदार कामगिरी सुरू राहिली. त्याने उत्तर विभागाकडून खेळताना मोठी कामगिरी केली. त्याने पूर्व विभागाविरुद्ध दुलिप ट्रॉफीच्या इतिहासात चार चेंडूंमध्ये चार बळी घेणारा पहिला गोलंदाज होण्याचा विक्रम केला.या स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो कपिल देव (१९७९) आणि लेग-स्पिनर साईराज बहुतुले (२००१) नंतरचा केवळ तिसरा खेळाडू आहे.