

Vaibhav Suryavanshi U19 World Cup 2026: भारताचा युवा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीने १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला. त्यानं १७५ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताना आपला सहावा U19 वर्ल्डकप जिंकला. भारतानं अंतिम सामन्यात इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. या विजयानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल केला होता. वैभवच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या क्रिकेट करिअरसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला होता. त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे.
१४ वर्षाच्या वैभवनं युवा क्रिकेट विश्वातील सर्वात महत्वाच्या स्पर्धेत आपल्या बॅटनं जलवा दाखवला. त्यानं अवघ्या ८० चेंडूत १७५ धावा ठोकल्या. ही या श्रेणीतील एक ऐतिहासिक आणि स्मरणीय खेळी ठरली. या खेळीत त्यानं १५ षटकार ठोकले. तर तेवढेच चौकर देखील मारले. वैभवच्या या खेळीमुळं भारतानं इंग्लंडसमोर ४११ धावांचा डोंगर उभराला.
भारताचे ४१२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी चांगल्या धावगतीने धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठराविक अंतराने त्यांनी विकेट्स गमावल्या. अखेर त्यांचा १०० धावांनी पराभव झाला. इंग्लंडकडून कालेब फालकॉनेरने ६७ चेंडूत ११५ धावांची दमदार खेळी केली. मात्र इंग्लंडचा डाव ४०.२ षटकात ३११ धावांवर संपुष्टात आला.
या विजयानंतर राजस्थान रॉयल्सने आपल्या लाडक्या वैभव सूर्यवंशीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत वैभव वर्ल्डकप ट्रॉफी हातात घेऊन मोबाईलवरून व्हिडिओ कॉलवर वडिलांशी बोलत होता. याला राजस्थान रॉयल्सने पापा प्रणाम असे बोलके कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत. त्याने सामनावीराचा पुरस्कार हा १९ वर्षाखालील भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफला समर्पित केला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी वैभव म्हणाला, 'सध्याच्या घाडीला मला कसं वाटतंय हे मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. मात्र आम्ही सर्वांनी यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. गेल्या ७ ते ८ महिन्यापासून आम्ही याच्यावर काम करत होतो. आमचा सपोर्ट स्टाफ सतत आमच्यासोबत होता. त्यांनी सतत आमची काळजी घेतली. मी माझा हा पुरस्कार त्यांना समर्पित करू इच्छितो. गेल्या सात आठ महिन्यांपासून सपोर्ट स्टाफ आणि टीम एकत्रित काम करत आहे. या तयारीचे आमच्या आजच्या या विजयात मोठं योगदान आहे.'
विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी हा U19 वर्ल्डकप इतिहासातील सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार जिंकणार पहिला खेळाडू ठरला आहे. यावरूनच भारताच्या विजयात त्याचे किती मोठे योगदान आहे हे दिसून येते.