

नवी दिल्ली : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने गेल्या काही काळात आपल्या बॅटने अशी काही धडाकेबाज कामगिरी केली आहे, जिची उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या फलंदाजीची छाप पाडणाऱ्या वैभवचा गौरव आता चक्क राष्ट्रपती भवनात झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वैभवला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यासाठी उपस्थित राहावे लागल्याने तो बिहारच्या विजय हजारे करंडकातील महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकला नाही.
बिहार संघाचे प्रतिनिधित्व करताना वैभवने विजय हजारे करंडकात आपला दरारा निर्माण केला आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ८४ चेंडूंत १९० धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १५ उत्तुंग षटकार ठोकले होते. या दमदार कामगिरीनंतर मणिपूरविरुद्धच्या सामन्यात मात्र तो खेळू शकला नाही, कारण त्याला हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला रवाना व्हायचे होते.
वैभव सूर्यवंशीने भारत-ए आणि भारतीय १९ वर्षांखालील (Under-19) संघातून खेळताना सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्याने सोने केले असून आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य असून, संघाने त्याला आगामी हंगामासाठी कायम (रिटेन) ठेवले आहे. आयपीएल २०२५ मधील ७ सामन्यांत २५२ धावा करून तो प्रकाशझोतात आला होता. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, ‘तुमच्या असाधारण प्रतिभेने शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नाविन्य, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. तुम्ही सर्वांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य केले आहे. वेळेअभावी मी केवळ काही मुलांचीच नावे घेऊ शकत आहे, परंतु आज सन्मानित झालेला प्रत्येक बालक तितकाच आदरणीय आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले की, ‘वीर बाल दिवस’ हा गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या (साहिबजादे) बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. ९ जानेवारी २०२२ रोजी गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी घोषणा केली होती की, साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या बलिदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. त्यांचे हे बलिदान आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे.