

ॲशेस मालिके दरम्यान चार दिवसांच्या विश्रांतीसाठी इंग्लंडचा संघ 'नुसा' येथे गेला असताना, खेळाडूंच्या कथित मद्यपानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
cricket controversy
सिडनी : अॅशेस मालिका २०२५ मध्ये इंग्लंडचा संघ आधीच ३-० ने पिछाडीवर आहे. संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा अत्यंत सुमार झाली. फलंदाजीमध्ये बेन डकेटने सर्वांत नामुष्कीजनक कामगिरी केली आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांत डकेटची सर्वोच्च धावसंख्या केवळ २८ राहिली आहे. अशातच, मैदानाबाहेरील एका वादाने इंग्लंडच्या अडचणीत भर घातली आहे. चार दिवसांच्या विश्रांतीसाठी संघ 'नुसा' (Noosa) येथे गेला असताना, खेळाडूंच्या कथित मद्यपानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने या संपूर्ण प्रकरणात बेन डकेटची पाठराखण केली आहे. 'द टेलिग्राफ'मधील आपल्या स्तंभात वॉनने स्पष्टपणे नमूद केले की, खेळाडूंवर टीका त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीवर व्हायला हवी, ते सुट्टीत काय करतात यावर नाही. वॉनने लिहिले की, "नुसा येथील वर्तनासाठी मी इंग्लंड संघावर टीका करणार नाही. मैदानात ते काय करत आहेत, कसे खेळत आहेत आणि सामन्याची तयारी कशी करत आहेत, यावरून मी त्यांच्यावर टीका करेन. सुट्टीत दोन दिवस काही बिअर पिणाऱ्या तरुण खेळाडूंकडे मी बोट दाखवणार नाही. मी स्वतः इंग्लंडसाठी खेळताना नेमके हेच केले होते."
वॉनने डकेटला एक सल्लाही दिला आहे. तो म्हणाला, "फरक फक्त एवढाच आहे की, मला माहीत असायचे की कधी घरी परतायचे आहे. कदाचित बेन डकेटला हीच गोष्ट शिकण्याची गरज आहे." डकेटवर कारवाई करण्याची मागणी वॉनने पूर्णपणे फेटाळून लावली. त्याच्या मते, हा केवळ एका खेळाडूचा किंवा संघाचा प्रश्न नसून क्रिकेट संस्कृतीशी संबंधित विषय आहे.
वॉनने पुढे म्हटले की, "उपलब्ध पुराव्यांच्या आधारे डकेट किंवा इतर कोणत्याही खेळाडूला फटकारले जाऊ नये. हा एक व्यापक मुद्दा आहे. क्रिकेटने स्वतःच एक 'ड्रिंकिंग कल्चर' निर्माण केली आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांत हीच संस्कृती आहे. जर तुम्ही तरुण खेळाडूंना तीन-चार दिवसांची सुट्टी दिली, तर ते असेच काहीतरी करणार."
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. यामध्ये बेन डकेट कथितरित्या नशेत असल्याचे दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ याच दौऱ्यातील आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. "आंतरराष्ट्रीय संघासाठी अतिमद्यपान स्वीकारार्ह नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्राथमिक अहवालानुसार खेळाडूंचे वर्तन सामान्य होते, असेही त्यांनी जोडले.
मैदानाबाहेरील वादापेक्षा मैदानातील परिस्थिती इंग्लंडसाठी अधिक चिंताजनक आहे. २०११ पासून इंग्लंडने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. गेल्या १८ कसोटी सामन्यांपैकी इंग्लंडने १६ गमावले आहेत, तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. आता मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघासमोर ५-० असा मानहानीकारक पराभव टाळण्याचे मोठे आव्हान आहे. जर असे झाले, तर अॅशेसच्या इतिहासात चौथ्यांदा इंग्लंडचा 'व्हाईट वॉश' होईल.