

अवघ्या १४ वर्षांचा असलेला वैभव सूर्यवंशी जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो, तेव्हा तो स्फोटक फलंदाजी करतो. इतक्या लहान वयातही गोलंदाज वैभवच्या समोर चेंडू टाकताना कचरतात. वैभवच्या खेळण्याचा एकच मंत्र आहे, ‘चेंडू आला की त्याला सीमारेषेबाहेर पाठवायचे.’ सध्या वैभव रणजी करंडक स्पर्धेत बिहार संघाकडून खेळत आहे, तिथेही त्याचा हा आक्रमक पवित्रा कायम राहिला. मात्र, अवघ्या सात धावांनी त्याला शतकाने हुलकावणी दिली.
युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी रणजी करंडक स्पर्धेत आपल्या बिहार संघासाठी खेळत आहे. बिहार आणि मेघालय यांच्यात झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ ६७ चेंडूंमध्ये ९३ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीत त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार आले. यादरम्यान वैभवचा स्ट्राइक रेट १३८.८० राहिला. वैभवने अगदी टी-२० शैलीत फलंदाजी केली. आकडेवारी पाहिली, तर त्याने चौकार-षटकारांच्या जोरावरच अवघ्या १३ चेंडूंवर ६० धावा फटलावल्या. तथापि, आक्रमक फटके खेळण्याच्या प्रयत्नात त्याचे शतक केवळ ७ धावांनी हुकले.
या सामन्यात मेघालय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गड्यांच्या मोबदल्यात ४०८ धावा करून आपला डाव घोषित केला. यात अजय दुहानच्या शतकाचा (२१७ चेंडूंमध्ये १२९ धावा) समावेश होता. तसेच स्वास्तिक छेत्रीनेही २०५ चेंडूंमध्ये ९४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. प्रत्युत्तरात बिहारने पहिल्या डावात चार गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. यापूर्वी मणिपूरविरुद्धच्या सामन्यात वैभवला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती, तर अरुणाचलविरुद्ध तो केवळ १४ धावा काढून लवकर बाद झाला होता.
वैभव सूर्यवंशी आता लवकरच ‘भारत ए’ संघाकडून खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयने १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 'रायझिंग स्टार्स आशिया कप'साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये यष्टिरक्षक जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील संघात वैभव सूर्यवंशीचाही समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत वैभव कशी कामगिरी करतो, याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष लागून राहील.