

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 Earnings : राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये पोहोचू शकला नसला, तरी त्यांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आयपीएल २०२६ मधून कोट्यवधींची कमाई केली आहे.
राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) या १५ वर्षीय युवा खेळाडूने यंदाच्या हंगामात झंझावती फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यंदाच्या हंगामात सर्वाधिक ७७६ धावा करत तो 'ऑरेंज कॅप'चा (Orange Cap) मानकरी ठरला आहे.
मागच्या वर्षीच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याच्या कामगिरीच्या तुलनेत ही किंमत राजस्थानसाठी अत्यंत फायदेशीर ठरली. यंदाच्या वर्षासाठीही त्याची मूळ कराराची रक्कम १.१० कोटी रुपयेच होती, मात्र त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची प्रत्यक्ष कमाई यापेक्षा कितीतरी पटीने जास्त झाली आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ फायनल गाठण्यात अपयशी ठरला असला, तरी वैभव अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर, वैभवला सादरीकरण सोहळ्यात बोलावून यंदाच्या हंगामातील 'मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर' (MVP) म्हणून सन्मानित करण्यात आले.
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आयपीएल २०२६ मधून कोट्यवधींची कमाई केली आहे. रिटेनर फी (करार रक्कम), मॅच फी आणि रोख पुरस्कार मिळून वैभवने या हंगामात तब्बल २.५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.बक्षीस वितरण समारंभात त्याने अनेक मानाचे पुरस्कार आणि त्यासोबत मिळणाऱ्या रोख रकमांवरही आपले नाव कोरले. हे पुरस्कार आणि त्यांच्या बक्षिसांची रक्कम खालीलप्रमाणे...
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर (MVP): १५ लाख रुपये
ऑरेंज कॅप (हंगामात सर्वाधिक धावा): १० लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन: १० लाख रुपये (सोबत 'टाटा सिअरा' गाडी)
सुपर सिक्सस ऑफ द सीजन: १० लाख रुपये (हंगामात तब्बल ७२ षटकार ठोकल्याबद्दल)
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन: १० लाख रुपये
१.१० कोटी रुपयांची वार्षिक कराराची रक्कम आणि रोख पुरस्कारांव्यतिरिक्त वैभवला प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये 'मॅच फी' म्हणून मिळाले. या हंगामात तो राजस्थानसाठी एकूण १६ सामने खेळला, ज्यामुळे केवळ मॅच फीमधूनच त्याने तब्बल १.२० कोटी रुपयांची कमाई केली.
अनेक सामन्यांमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि इतर कामगिरीचे पुरस्कार पटकावून मोठी रोख रक्कम मिळवली. सामन्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळणारे 'इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच' किंवा 'मोस्ट सिक्सस ऑफ द मॅच' यांसारखे वैयक्तिक पुरस्कार त्याने अनेकदा जिंकले, ज्यासाठी प्रत्येक पुरस्कारामागे त्याला १ लाख रुपये मिळाले. या सर्व बक्षिसांची एकत्रित बेरीज केली असता, आयपीएल २०२६ च्या हंगामातून वैभव सूर्यवंशीची एकूण कमाई २.५० कोटी रुपयांच्या पार गेली आहे.