

Vaibhav Sooryavanshi IND A vs SL A : भारतीय क्रिकेटचा नवा उगवता तारा वैभव सूर्यवंशी याने त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका 'अ' संघाविरुद्ध वादळी फलंदाजी करत इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना वैभवने प्रियांश आर्याच्या साथीने भारताला तुफानी सुरुवात करून दिली. या सामन्यात वैभवने केवळ ११ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून २० वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला. यासह वैभव लिस्ट-ए (List A) क्रिकेटमध्ये जगातील सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे.
त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारत 'अ' कडून वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या या सलामीवीरांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. दोघांनाही काही जीवदाने मिळाली, याचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवला. भारत 'अ' संघाने अवघ्या ३ षटकांत ५० धावांचा टप्पा पार केला. वैभव एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली आणि ११ चेंडूत ५० धावा पूर्ण करत विश्वविक्रमाला गवसणी घातली.
लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विश्वविक्रम भारताच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने आपल्या नावावर केला असून, त्याने २०२६ मध्ये भारत 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ' सामन्यात अवघ्या ११ चेंडूंत हा कारनामा केला. यापूर्वी हा विक्रम के. वीररत्ने याच्या नावावर होता, ज्याने २००५/०६ मध्ये रागमा क्रिकेट क्लबकडून खेळताना कुरुनेगला यूथविरुद्ध १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा एन.एल.टी.सी. परेरा असून त्याने २०२०/२१ मध्ये श्रीलंका आर्मीकडून ब्लूमफिल्डविरुद्ध १३ चेंडूंत पन्नास धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या आर.के. क्लेनवेल्टने २०१०/११ मध्ये वेस्टर्न प्रॉव्हिन्ससाठी क्वाझुलु-नाटालविरुद्ध १४ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याची किमया केली होती. तर संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर ए.जे. हॉलिओके (सरे विरुद्ध यॉर्कशायर, १९९४) आणि पाकिस्तानचा सलमान बट (नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान विरुद्ध लाहोर ईगल्स, २००८/०९) हे दोघे असून त्यांनी प्रत्येकी १५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
फायनलच्या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना पाणी पाजणाऱ्या वैभव सूर्यवंशीची ही वादळी खेळी अखेर संपुष्टात आली. तो शतकाच्या दिशेने वेगाने कूच करत होता, मात्र सहान आराचिघेच्या चेंडूवर तो बाद झाला. वैभवने २९ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ८ गगनभेदी षटकारांच्या मदतीने ९४ धावांची डोळे दिपवणारी खेळी केली. वैभव आणि प्रियांश आर्या यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ५३ चेंडूंमध्ये १३२ धावांची भागीदारी रचली.
आयरलँडविरुद्ध २६ जूनपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीची वरिष्ठ भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएल २०२६ मधील धमाकेदार कामगिरीनंतर, आता त्रिकोणी मालिकेच्या फायनलमध्ये त्याने केलेल्या या खेळीमुळे आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी (International Debut) त्याचा दावा अधिक मजबूत झाला आहे. बीसीसीआयने आयरलँड आणि इंग्लंड दौऱ्यावरील एकूण ५ टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती, ज्यात वैभवला पहिल्यांदाच संधी मिळाली. आता १५ वर्षांचा हा युवा फलंदाज प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जर त्याला संधी मिळाली, तर तो भारतासाठी सर्वात तरुण वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू बनेल आणि या बाबतीत तो थेट महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही मागे टाकेल.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये १६ सामन्यांत २३७.३१ च्या अद्भूत स्ट्राईक रेटने सर्वाधिक ७७६ धावा केल्या होत्या, ज्यात तब्बल ७२ षटकारांचा समावेश होता. आयपीएलमधील या यशानंतर भारतीय संघात निवड झालेला वैभव श्रीलंका दौऱ्यावर दांबुलाच्या संथ खेळपट्ट्यांवर संघर्ष करताना दिसला होता. फायनलपूर्वीच्या चार सामन्यांत त्याने अनुक्रमे १४, ४४, २१ आणि ३८ धावा केल्या होत्या. त्यामुळे वैभव आयपीएलसारख्या फॉर्ममध्ये कधी परतणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, या १५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने टीकाकारांना फार वेळ दिला नाही आणि थेट अंतिम सामन्यातच 'विराट' रूप धारण करत फॉर्ममध्ये पुनरागमन केले.