

कोलकाता: आयपीएल २०२६ मधील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. अवघ्या २९ चेंडूंत ९७ धावांची तुफानी खेळी साकारून वैभवने एकाच सामन्यात अनेक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढले आहेत. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीपुढे डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल आणि सुरेश रैना यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे विक्रमही फिके पडले आहेत.
जरी वैभव आपले तिसरे शतक अवघ्या ३ धावांनी हुकला असला, तरी त्याच्या या खेळीने राजस्थान रॉयल्सला एलिमिनेटरमध्ये मजबूत स्थितीत आणून ठेवले.
आयपीएलच्या एका हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावावर नोंदवला गेला आहे. २०१६ च्या हंगामात डेव्हिड वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये एकूण ४६७ धावा केल्या होत्या. वैभवने यंदाच्या हंगामात ४९० धावांचा टप्पा गाठत वॉर्नरचा १० वर्षांचा जुना विक्रम धुळीस मिळवला आहे. या यादीत ट्रॅव्हिस हेड (४०२), साई सुदर्शन (४०२) आणि ॲडम गिलख्रिस्ट (३८२) यांसारखे दिग्गज आता खूप मागे पडले आहेत.
वैभव सूर्यवंशी : ४९० धावा (२०२६)
डेव्हिड वॉर्नर : ४६७ धावा (२०१६)
ट्रॅव्हिस हेड : ४०२ धावा (२०२४)
साई सुदर्शन : ४०२ धावा (२०२५)
ॲडम गिलक्रिस्ट : ३८२ धावा (२००९)
वैभवने आपल्या डावाची सुरुवात ज्या आक्रमकतेने केली, ती पाहून हैदराबादचे गोलंदाज हतबल झाले होते. पहिल्या सहा षटकांतच वैभवने ८ षटकार ठोकले. यासह आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने सनथ जयसूर्या (७), जोस बटलर (७) आणि जॉनी बेअरस्टो (७) यांना मागे सोडले आहे. इतकेच नाही तर, आयपीएलच्या एका डावात १० पेक्षा अधिक षटकार मारण्याचा कारनामा वैभवने चार वेळा केला असून, या विक्रमात त्याने आता वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.
वैभव सूर्यवंशी : ८ षटकार (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध, २०२६)
सनथ जयसूर्या : ७ षटकार (चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध, २००८)
जोस बटलर : ७ षटकार (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध, २०१८)
जॉनी बेअरस्टो : ७ षटकार (आरसीबी विरुद्ध, २०२२)
अभिषेक शर्मा : ७ षटकार (पंजाब किंग्स विरुद्ध, २०२६)
वैभव सूर्यवंशी : ७ षटकार (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध, २०२६)
एलिमिनेटरसारख्या दबावाच्या सामन्यात वैभवने केवळ १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या प्ले-ऑफ (नॉकआउट) सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम यापूर्वी सुरेश रैनाच्या नावावर होता. २०१४ च्या क्वालिफायर सामन्यात रैनाने १६ चेंडूंत पन्नास धावा केल्या होत्या. तब्बल १२ वर्षांनंतर वैभवने रैनाच्या या विक्रमाशी बरोबरी साधत आपली क्षमता सिद्ध केली आहे.
१६ चेंडू : सुरेश रैना विरुद्ध पंजाब किंग्स (२०१४)
१६ चेंडू : वैभव सूर्यवंशी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (२०२६)
१७ चेंडू : ॲडम गिलक्रिस्ट विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२००९)
२० चेंडू : एम.एस. धोनी विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०१२)
वैभवची रेकॉर्डब्रेक कामगिरी इथेच थांबली नाही. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ख्रिस गेलचा १४ वर्षांपूर्वीचा (२०१२) विक्रमही वैभवने मोडीत काढला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी ही कामगिरी करून त्याने आपण केवळ भविष्यातील स्टार नसून, वर्तमानातीलही एक महाभयंकर फलंदाज असल्याचे दाखवून दिले आहे.
या सामन्यात वैभवने आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आयपीएलच्या एका हंगामात ६०० धावांचा टप्पा गाठणारा तो आतापर्यंतचा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, जो त्याने २०१८ मध्ये नोंदवला होता. सध्या वैभवच्या नावावर ६८० धावा असून, त्यात विक्रमी ६५ षटकारांचा समावेश आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आता सर्वात आघाडीवर आहे.