

कमलेश गिरी
आयपीएलच्या यंदाच्या महापर्वाची सांगता नुकतीच झाली. या हंगामात 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या तडफदार फलंदाजाने अद्वितीय कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांना आणि दिग्गज खेळाडूंना स्तीमित केले. या मोसमात वैभवने धावांचा पाऊस पाडत मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन, ऑरेंज कॅप यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. पाकिस्तानातही त्याच्या खेळण्याच्या शैलीची आणि तंत्राची मोठी प्रशंसा होत आहे. दबावाच्या परिस्थितीतही शांत राहून चांगली कामगिरी करण्याची त्याची क्षमता विराट कोहलीच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देते.
नोव्हेंबर २०२४ मधील आयपीएलच्या लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सचे संचालक झुबिन भरुचा यांनी व्यवस्थापनाला एका अत्यंत अनपेक्षित खेळाडूसाठी तब्बल १० कोटी रुपये राखून ठेवण्यास सांगितले होते. केवळ १३ वर्षांच्या एका मुलासाठी एवढी अवाढव्य रक्कम बाजूला ठेवण्याचा सल्ला ऐकून सर्वच जण थक्क झाले होते. भरुचा यांनी यापूर्वी यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांच्या बाबतीतही असाच अंदाज वर्तवला होता, जो पुढे तंतोतंत खरा ठरला. भरुचा यांनी तळेगाव येथील रॉयल्सच्या अकादमीत वैभवची एक विशेष चाचणी घेतली होती. त्या चाचणीत ताशी १५७ किलोमीटर या अवाढव्य वेगाने येणार्या साईड आर्म चेंडूंना वैभवने ज्या कमालीच्या सहजतेने सोडले आणि काही चेंडू थेट साईटस्क्रीनच्या वरून षटकारांसाठी भिरकावले, ते पाहून भरुचा यांना त्याच्यातील अफाट क्षमतेची खात्री पटली होती. अखेर लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १.१ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. एका शाळकरी मुलासाठी ही प्रचंड मोठी रक्कम होती; पण पुढे जाऊन या बालरत्न वैभवने मिळणार्या पैशांपेक्षाही आपली कामगिरी सरस असल्याचे दाखवून दिले.
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्याने बिहारसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. आधुनिक क्रिकेटच्या इतिहासात एवढ्या कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. तिथून सुरू झालेला हा प्रवास २०२६ मध्ये एका ऐतिहासिक शिखरावर पोहोचला आहे. गतवर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने आपल्या आक्रमक शैलीची झलक दाखवली होती; परंतु यंदाच्या हंगामात त्याने खर्याअर्थाने धावांचा पाऊस पाडला. या हंगामात त्याने अवघ्या १६ सामन्यांमध्ये २३७.३० च्या अद्भुत स्ट्राईक रेटने ७७६ धावा काढल्या. यामध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ठोकलेल्या शतकाचाही समावेश होता. ख्रिस गेल, रोहित शर्मा किंवा डेव्हिड वॉर्नर यांसारख्या दिग्गजांनाही त्यांच्या पहिल्या पूर्ण आयपीएल हंगामात अशी कामगिरी करता आली नव्हती. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स आणि कागिसो रबाडा यांसारख्या जगातील सर्वात घातक गोलंदाजांचा त्याने ज्या पद्धतीने समाचार घेतला, ते पाहून माजी क्रिकेटपटूंना १६ वर्षांच्या सचिन तेंडुलकरची आठवण झाली. पुरुष टी-२० क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
ख्रिस गेलच्या ३० चेंडूंच्या ऐतिहासिक शतकानंतरचे हे आयपीएलमधील दुसरे सर्वात वेगवान शतक मानले गेले. एवढेच नव्हे, तर फेब्रुवारी २०२६ मध्ये झिम्बाब्वेमधील हरारे येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूंत १७५ धावांची महाविध्वंसक खेळी खेळली. ही धावसंख्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. संपूर्ण विश्वचषकात त्याने ४३९ धावा करून भारताला सहावे जगज्जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून आयपीएल प्लेऑफमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. याच संघाविरुद्ध त्याने ३६ चेंडूंत शतक झळकावले, जे आयपीएलच्या इतिहासातील तिसरे सर्वात वेगवान शतक आहे. आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात दोन शतके झळकावणारा तो पहिला अनकॅप्ड फलंदाज ठरला आहे. तसेच, यशस्वी जयस्वालचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने मोठ्या फरकाने पार केला. वैभवने एकाच आयपीएल हंगामात ७२ षटकार ठोकून ख्रिस गेलचा एका मोसमात ५९ षटकार मारण्याचा अनेक वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला. ‘क्वालिफायर दोन’ च्या सामन्यात तो आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात आणि सर्वात जलद (अवघ्या ४४० चेंडूंत) १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने आंद्रे रसेलचा विक्रम शंभरहून अधिक चेंडूंच्या फरकाने मागे टाकला. त्याच्या ७७६ धावांपैकी तब्बल ५२१ धावा या पहिल्या सहा षटकांमध्ये (पॉवरप्ले) काढल्या असून हादेखील एक नवीन विक्रम आहे.
वैभवने उभारलेला धावांचा डोंगर हा त्याच्या मेहनतीचे आणि फलंदाजीच्या तंत्राचे यश आहे. फ्रंटफूटवर वजन हस्तांतरित करण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. त्यामुळे कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह आणि लाँग ऑनच्या दिशेने खेळलेले त्याचे फटके अत्यंत प्रभावी असतात. विशेष म्हणजे, तो फक्त टायमिंगवर अवलंबून न राहता संपूर्ण शरीराची ताकद वापरून चेंडू फटकावतो. काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी त्याच्या बॅट स्विंगची तुलना बेसबॉल खेळाडूंच्या शक्तिशाली स्विंगशी केली आहे. बॅक लिफ्ट उंच ठेवणे, चेंडूच्या खाली जाऊन उंच फटका मारणे आणि मनगटांचा प्रभावी वापर करून चेंडू सीमारेषेबाहेर पाठवणे, ही त्याच्या खेळाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये बहुतांश युवा फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहज खेळतात; पण फिरकीविरुद्ध अडखळतात. सूर्यवंशीच्या बाबतीत चित्र उलटे दिसते. तो पायांचा वापर उत्कृष्ट करतो. पुढे येऊन षटकार मारणे किंवा मागे सरकून पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने फटके खेळणे, हे त्याचे मोठे बलस्थान आहे. त्यामुळे गोलंदाजांना त्याच्यासाठी ठरावीक क्षेत्ररचना करणे कठीण जाते.
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी हे स्वतः एक महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटू होते; परंतु ९० च्या दशकात बिहार क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयची मान्यता नसल्यामुळे आणि राज्यातील क्रीडा अनास्थेमुळे त्यांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी मुंबईत येऊन बाऊन्सर म्हणून काम केले. जहाजांवर वेगवेगळ्या कष्टाच्या नोकर्या केल्या. आपल्या पाच-सहा वर्षांच्या मुलामध्ये क्रिकेटची उपजत आवड आणि गुणवत्ता पाहिली, तेव्हा मात्र त्यांनी आपली सर्व स्वप्ने वैभवच्या डोळ्यांतून पाहण्यास सुरुवात केली. वैभवला उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आपल्या जुन्या स्कॉर्पिओ गाडीतून ताजपूर ते पाटणा असा दररोज तब्बल २०० किलोमीटरचा खडतर प्रवास सुरू केला. पाटण्यातील ‘जेन नेक्स्ट’ क्रिकेट अकादमीत वैभवला दाखल करण्यात आले. तिथे वैभव दररोज पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत किमान ६०० चेंडूंचा सराव करत असे. प्रशिक्षकांनी वैभवच्या नैसर्गिक आक्रमकतेला कधीही लगाम घातला नाही. त्यांनी त्याला बचावात्मक खेळ शिकवण्याऐवजी चेंडूवर प्रहार करण्याचे आणि धावांचे नवनवीन पर्याय शोधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. याचा फायदा आज त्याच्या खेळात स्पष्ट दिसतो. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वैभव १५ वर्षांच्या मुलांसोबत खेळत असे आणि तरीही तो त्यांच्यापेक्षा अधिक प्रगल्भ वाटायचा.
भारतीय क्रिकेटने यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, विराट कोहली आणि शुभमन गिल यांसारखे फलंदाज पाहिले आहेत. वैभव सूर्यवंशी अजून त्या पातळीपासून दूर आहे; मात्र आयपीएल २०२६ नंतर एवढे निश्चितपणे म्हणता येईल की, येणारा काळ वैभवचा असेल. त्याच्या यशाचे खरे श्रेय निर्भीडपणामध्ये आहे. विविध गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास करून आपली फलंदाजीची रणनीती ठरवणे वैभवला मान्य नाही. त्यापेक्षा समोर आलेला चेंडू कोणत्याही स्थितीत लांब फटकावणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून तो मैदानात उतरतो. ही अर्जुनावस्था त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरली आहे.
वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगची शैली वेगवान आणि अप्रतिम आहे. विशेष म्हणजे, यॉर्कर आणि बाऊन्सर चेंडू फटकाविताना त्याला वेळ मिळतो. त्यामुळेच तो फ्रंटफूटवर वेगवान फटके मारू शकतो, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी त्याचे कौतुक करताना म्हटले आहे.