

Vaibhav Sooryavanshi IND A vs SL A: वनडे ट्रायसिरीज अंतर्गत भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात दुंबुला आज पहिला सामना झाला. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू आणि आयपीएल स्टार वैभव सूर्ववंशीकडे सर्वांचे लक्ष होते. आयपीएलचा सीजन गाजवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर वैभव कशी कामगिरी करतो याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र वैभवला पहिल्या सामन्यात आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर त्याचा दोन षटकेच निभाव लागला.
भारत अ फलंदाजी करत असताना वैभव सूर्यवंशी सलामीला खेळण्यासाठी आला. त्याने आल्या आल्या काही आकर्षक फटके मारले. त्याने १२ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने तीन चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. आता वैभव आयपीएलप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दमदार कामगिरी करणार असं वाटत असतानाच श्रीलंका अ संघाचा गोलंदाज मोहम्मद शिराजने त्याची विकेट घेतली.
शिराजने सूर्यवंशीला फूल लेंथ चेंडू टाकला होता. वैभवने देखील या चेंडूचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला चेंडू चांगला टाईम आणि प्लेस करता आला नाही. त्याने थेट मिड ऑफच्या फिल्डरच्या हातात कॅच दिली.
वैभव बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी चांगलाच जल्लोष केला. मोहम्मद शिराजने वैभवची विकेट सेलिब्रेट केला. श्रीलंकेसाठी वैभवची विकेट किती महत्वाची होती हे यावरून दिसून येते. वैभव बाद झाल्यानंतर तो निराश दिसला. भारताला १६ धावावर असताना पहिला धक्का बसला.
वैभवने गेल्याच महिन्यात आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी करत जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. त्यानंतर त्याची भारतीय टी २० संघात देखील निवड झाली आहे. निवडसमितीने त्या आधी त्याला भारतीय अ संघात घेऊन त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची तयारी चाचपण्याचा प्रयत्न केला.
वैभवने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये ७७६ धावा केल्या आहेत. त्याने २३७ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याने यंदाच्या हंगामात ७२ षटकारांचा पाऊस पाडला होता. त्याने ऑरेंज कॅपसह पाच पुरस्कार देखील पटकावले.